'लाॅकडाऊन'मुळे माणगांव तालुक्यातील हजारो रिक्षा, मिनिडोर आणि टेम्पो चालक-मालक आर्थिक विवंचनेत
संबंधितांना शासनाच्या आर्थिक सहकार्याची गरज
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : देशात पसरलेल्या कोरोना विषाणूची संक्रमण साखळी रोखून या महाभयंकर महामारीचे संपूर्ण भारतातून समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे देशातील अत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारचे उद्योग धंदे, दुकाने, बाजारपेठा आणि सर्व प्रकारच्या खासगी आणि सरकारी परिवहन सेवा पुर्णपणे बंद केल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील सर्व विभागात आपल्या रिक्षा, मिनिडोर, पॅजो आणि छोट्या-मोठ्या मालवाहू टेम्पोच्या माध्यमातून आपली रोजीरोटी आणि उदरनिर्वाह करणारे हजारो रिक्षा, पॅजो, मिनिडोर आणि टेम्पो चालक मालक लाॅकडाऊन मुळे आर्थिक विवंचनेत येवून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने इतरांप्रमाणे त्यांनाही आर्थिक मदतीचा हात देवून त्यांना आर्थिक सहकार्य करणे गरजेचे आहे.
शासनाच्या खाजगीकरण, उदात्तीकरण आणि जागतिकीकरण या धोरणामुळे आणि यांत्रिकीकरण यामुळे देशातील बहुतांशी तरुणाईवर बेकारीची वेळ आली आहे. त्यामुळे देशातील शिक्षित आणि उच्च शिक्षित तरुणांना नोकर्या मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे देशातील, राज्यातील आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील बहुतांशी शिक्षित आणि उच्च शिक्षित बेकार बेरोजगार तरुणांनी विविध बैंकांची कर्ज काढून रिक्षा, मिनिडोर, पॅजो आणि छोटे मोठे मालवाहू टेम्पो घेतले. बँकेचे कर्ज काढून घेतलेल्या या रिक्षा, मिनिडोर, पॅजो आणि टेम्पोच्या माध्यमातून त्यांना सरकारी अकार्यक्षमतेच्या बेकारीचा हा अभिशाप पुसून काढायचा होता. त्यामुळे ते आपल्या व आपल्या कुटूंबाच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपापल्या विभागात आपल्या रिक्षा, मिनिडोर, पॅजोच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सेवा सुरू केली, तर टेम्पो चालकांनी आपल्या टेम्पो च्या माध्यमातून आपापल्या गावातील, विभागातील मालवाहतूकीचे भाडे मारून आपल्या रोजीरोटीची सुरूवात केली होती.
मात्र देशातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात खबरदारी च्या दृष्टीकोनातून शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदमुळे रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील विविध विभागात आपापल्या रिक्षा, मिनिडोर, पॅजो आणि टेम्पो या वाहनांच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील नागरिकांना सेवा देऊन आपल्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवून आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र रिक्षा चालवून प्रचंड मेहनत घेऊन पोट भरणार्या रिक्षा, मिनिडोर, पॅजो आणि टेम्पो चालक मालक यांच्या धंद्यावर या लाॅकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या संचारबंदीचा मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत आले आहेत. त्यामुळे शासनाने इतरांप्रमाणे त्यांना सुद्धा आर्थिक मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.