तळवली ग्रा.पं.मध्ये २४ तास कोरोना नियंत्रण कक्ष नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज
खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) :
वाढत चाललेल्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. या महामारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपयोजना करण्यात येत असुन त्याचाच एक भाग म्हणून २४ तास कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूबाबत सावध राहून आपले व आपल्या परिवाराबरोबरच सामाजिक आरोग्य कसे आबाधित ठेवता येईल यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच रुपाली कोस्तेकर, उपसरपंच मानसी लोखंडे, ग्रामसेविका सौ. आर. आर. पाटील यांनी केले आहे. याकामी ग्रामपंचायत सदस्य यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज असल्याचे देखील ग्रामपंचायतीच्या वतीने सांगितले आले आहे. आपत्कालीन परीस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायत मध्ये २४ तास कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशातील लॉकडाऊनचा कालावधीही वाढविण्यात आला असून देशवासियांनी सहकार्य करण्याचे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही देशवासियांना केले आहे.
तळवली ग्रा.पंचायत हद्दीतील सर्व वस्ती तसेच वाड्या वस्त्यांवर कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून प्रबोधनात्मक माहितीचे फलकही लावण्यात आले आहेत. तसेच सर्व गावांमध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे. जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शिक्षक, आशा सेविका, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केलेल्या चागंल्या कामाचे सरपंच,लउपसरपंच व सदस्यांनी कौतुक केले आहे. तसेच कोरोना आपत्तीशी लढण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज असल्याचे पहावयास मिळत आहे.