सह्याद्री प्रतिष्ठानने गरजूंना मदतीचा हात पुढे करत पुरवले जीवनावश्यक साहित्य
१० दिवसांत ४१५ गोर गरीब कुटूंबांना मदत
पेण (प्रशांत पोतदार) :
देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे लॉक डाऊन व संचार बंदी लागू करण्यात आली आहे. एकवीस दिवसाच्या कडक लॉक डाऊन मुळे पेण तालुक्यातील शहरी, ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गोर गरिबांचे हाल होत चालले आहेत त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील गोर गरिबांना गेल्या दहा दिवसा पासून पेण येथील दुर्ग सेवक सह्याद्री प्रतिष्ठान कडून अन्न धान्याचे वाटप करण्यात येत आहे.
नेहमीच संकट काळी सह्याद्री प्रतिष्ठांचे मावळे पुढे येऊन मदत कार्यात सहभागी होत आहेत. रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात अवकाळी पावसाचे संकट आले होते तेव्हा कोल्हापूर सांगली भागात दाणादाण उडाल्याने अनेक कुटुंबं बेघर झाली होती. त्यांनाही संकटकाळी सह्याद्री प्रतिष्ठांच्या मावळ्यांनी मदतीचा हात पुढे करत अन्न धान्याचे वाटप केले होते. सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे मदतीला धावून येत आहेत तर आपल्या सहकारी मित्र मंडळींचे मोलाचे सहकार्यही सह्याद्री प्रतिष्ठानला मिळत आहे. आता देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या महाभयंकर रोगामुळे देशात हाहाकार माजला आहे.
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गोर गरिबांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकविस दिवसा नंतर लॉक डाऊन वाढण्याची शक्यता असल्याने गोर गरीब नागरिकांना सरकार कडूनही आता गहू, तांदळाचा पुरवठा करण्यात येत आहे. पेण तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून पेण तसेच ग्रामीण भागातील ४०० गोर गरीब कुटूंबांना सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र उपाध्यक्ष समीर म्हात्रे तसेच पेण अध्यक्ष रुपेश कदम, गणेश गायकर, पंकज घोसाळकर, निकित पाटील आदी सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी प्रत्येक भागात मेहनत घेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
शहरी, ग्रामीण भागातील गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप करताना पेण मधील सागर वाडी, शिर्की गावापासून आठ किलो मिटर जिथे रस्तेही नीट नाहीत तेथे सरकारकडून फक्त तांदूळ गहू इत्यादी पुरवण्यात येत आहेत. अशा वाड्यांतील १५ गरीब गरजू कुटूंबांना सह्याद्री प्रतिष्ठान कडून मदतीचा हात म्हणून काही दिवसांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.