मुंबई चाकरमान्यांचा गावाकडे येण्यासाठी आक्रोश, सरकारदरबारी सहकार्याची अपेक्षा !
लोणेरे (उदय चव्हाण) :
कोरोना पाश्वभूमिवर सध्या चालू असलेल्या लाॅकडाऊनच्या कालावधीत मुंबईत असलेल्या चाकरमान्यांना गावाकडे पावसाळ्यापुर्वीच्या शेतीकामासाठी व गावातील आपल्या घराच्या डागडुजीसाठी येणे शक्य होत नसल्यामुळे मुंबईतील घरातून गावाकडे येण्यासाठी आक्रोश चालू आहे.
मुंबईत असलेले अनेक चाकरमनी गावाकडील आपल्या आई-वडीलांना, भाऊ-बहीणीला व अन्य नातेवाईकांना शेतीकामासाठी मदत करण्यासाठी दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात येत असतात. या शेतीच्या कामात शेतीची मशागत, शेतातील दगड-धोंडे वेचणे, बांध-बंधिस्ती करणे, ओहोळ आणि नाल्यांचे प्रवाह स्वच्छ करणे, इंधनासाठी लाकुडफाटा गोळा करणे, त्याशिवाय घरांची कौले शाकारणे, घरांची डागडुजी करणे इत्यादी कामे गावाकडील घरातील कमी माणसांना करणे अशक्य असल्याने त्यांना मदत करण्यासाठी मुंबई सारख्या शहरात असलेली मुलंबाळ किंवा इतर नातेवाईक दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात येत असतात. परंतु करोना व्हयरसच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाने पुकारलेल्या लाॅकडाऊनमुळे या मुंबईकर व इतर शहरातील चाकरमानी मंडळींना गावी येणे अशक्य झाल्याने गावाकडील शेती व घराची कामे अर्धवट राहून पावसाळ्यातील शेतीला व घरादाराला नुकसान होऊ शकते या चिंतेने ग्रासून त्यांचा आक्रोश सुरू आहे.
बहुतांशी चाकरमान्यांचा आक्रोश असा आहे की, गावाकडील घर व शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गावच्या स्थानिक आमदारांनी म्हणजेच कोकणातील सर्व आमदारांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र शासनाकडून या चाकरमान्यांसाठी कोव्हिड-१९ चाचण्या घेऊन त्यांना गावाकडे रवाना होण्यासाठी अनुमती द्यावी. शिवाय त्यांच्या प्रवासाची सुद्धा व्यवस्था करावी. गावक-यांच्या मनात संदिग्धता उत्पन्न होऊ नये म्हणून गावात पोहोचल्यानंतर पुन्हा शासकीय दवाखान्यात तपासणी करून होमकाॅरंटाइन सुद्धा करता येऊ शकते. असे अनेक चाकरमान्यांचे मत आहे.
हेच आमदार निवडणुकीच्या काळात या चाकरमान्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत त्यांच्या शहरातील अगदी झोपडपट्टीतील अडचणीच्या जागेपर्यंत पोहचून त्यांना मुंबईतून गावी येण्यासाठी व परत मुंबईकडे पाठवण्याची व्यवस्था करत असतात. शिवाय त्यांना काही हवं नको ते सर्व बारकाईने अर्थपूर्ण ध्यान ठेवत असतात. मात्र आता काही निवडणुका नाहीत म्हणून अशा बिकट प्रसंगात त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता असून त्यांना वा-यावर सोडणं उचित नाही. या चाकरमान्यांचे गा-हाणे सरकार दरबारी ऐकायला कोणीच वाली नसल्यामुळे हे चाकरमानी हतबल व निराश होऊन संतप्त भावनेतून निरनिराळ्या प्रतिक्रीया व्यक्त करत आहेत.
खरोखरच या चाकरमानी मतदारांना विसरून चालणार नाही. गावच्या सरपंच पदापासून ते आमदारकी, खासदारकी निवडणुक काळात प्रत्येक उमेदवार त्यांना अनन्यसाधारण महत्त्व देत त्यांची बडदास्त ठेवत असतो. परंतु आता गावी मज्जा करण्यासाठी नव्हे तर जगाच्या पोशिंद्याचा तो ही एक घटक असल्याने त्याला किमान गावाकडील शेतीची व घराची होणारी दुर्दशा थांबवण्यासाठी गावाकडे येण्याची आरोग्य चाचणीसहीत परवानगी द्यावी अथवा तशी शासकीय व खाजगी प्रवास व्यवस्था करण्यासाठी या पुढाऱ्यांनी पुढे येण्याची गरजच आहे.
मुंबईतल्या छोट्या खोलीत सुमारे आठ ते दहा व्यक्तींना इतके दिवस संकुचितपणे राहून घुसमटल्यासारखे झाले असून त्यांना गावाकडील आपल्या प्रशस्त घरांत व शिवारात मोकळा श्वास घेण्यासाठी राजकीय शक्तीच काहीतरी करू शकते असा चाकरमान्यांचा दृढ विश्वास आहे आणि असं होत नसेल तर कोव्हिड -१९ म्हणजे कोरोना रोग आज ना उद्या संपुष्टात येईलच परंतु त्यानंतर पुन्हा निवडणूकांचे सत्र सुरू होईल तेव्हा मात्र आम्ही चाकरमानी अशा उमेदवारांना नक्कीच लक्षात ठेऊ. अशाही संतप्त प्रतिक्रीया काही चाकरमानी व्यक्त करत आहेत.