कोरोना व संचारबंदी काळात खाजगी प्रवासी वाहतूक, गोरेगांव पोलीसांची धडक कारवाई
माणगांव (प्रतिनिधी) :
संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासन व प्रशासन खबरदारी व नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी लॉकडाऊन वेळापत्रकात परिस्थिती अनुरुप बदल करत आहे. केवळ नागरिकांनी सुरक्षित रहावे घराबाहेर अत्यावश्यक कामाखेरीज पडू नये म्हणून पोलीस प्रशासन देखील कर्तव्यदक्षपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे. परंतु काही नागरिक जाणीवपूर्वक शासकीय आदेशाचा भंग करताना दिसत आहेत. पण पोलीस प्रशासन देखील अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करत असतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोरेगांव ता. माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी प्रवासी वाहतूक करताना वाहन ईको क्रं. एम एच 06 बी ई 7426 व ईको क्रं एम एच 06 बी यु 9423 या दोन वाहनांवर देवळी-मूर रोडवरील मूर गांवच्या हद्दीत कारवाई करण्यात आली व दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रवासी वाहतुकदारांकडून मुंबई ते गोरेगांव असे प्रत्येक प्रवासी सीट रू. 2500 असे भाडे घेत असल्याची माहीती उघड झाली आहे. सदर कारवाई गांव पोलीस पाटील दिलीप भोस्तेकर यांच्या फिर्यादीप्रमाणे करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांची माहीती तुषार कोरपे रा. पहेल, व अनिल चिविलकर रा. लोणेरे, ता. माणगांव हद्दीतील रहीवासी आहेत. शासनाचा संचारबंदी आदेश झुगारुन आदेशाचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.अधिक तपास गोरेगांव पोलीस निरीक्षक श्री. टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री. जगताप हे पढील तपास करीत आहेत. अशा अवैध प्रवासी वाहतुकीबाबत गोरेगांव पोलीसांच्या या धडक कामगिरीबद्दल तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.