संशयित कोरोना रुग्णांच्या प्राथमिक चाचण्या माणगांव उपजिल्हा रुग्णालयात होणार !  


माणगांव (उत्तम तांबे) : 
दक्षिण रायगड मधील अत्यंत महत्वाचे आणि रुग्णांना नवसंजीवनी देणारे, मुंबई गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे माणगांव उपजिल्हा रुग्णालय होय. या रुग्णालयात रायगड आणि रत्नागिरीत काही जवळच्या तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी दररोज येत असतात. हे रुग्णालय १०० खाटांचे असून त्यामध्ये दररोज सरासरी ३०० रुग्ण उपचाराकरिता येत असतात. आता या रुग्णालयात रायगड जिल्ह्यातील संशयित कोरोना रुग्ण प्राथमिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यांच्यावर चाचणी करून निदान झाल्यावर त्या रुग्णांना आवश्यकतेनुसार पनवेल किंवा एम.जी.एम. दवाखान्यात हलविण्यात येईल अशी माहिती माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गौतम देसाई यांनी दिली. या रुग्णालयात एक महिन्यापूर्वीच १० खाटांचे अलगीकरण कक्ष तातडीने तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर अचानकपणे रुग्णांची संख्या वाढलीच तर आणखी ६ खाटांचे कक्ष तयार करण्यात आले. असे एकूण १६ वेगळे कक्ष तयार केले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि रुग्णांची योग्य ती खबरदारी घेण्यासाठी आणखी १० खाटांचे कक्ष रूग्णालयात दुसऱ्या मजल्यावर उभारण्यात येत असून हे काम काही दिवसात पूर्ण होइल असे डॉ. देसाई यांनी सांगितले. या रुग्णालयात संशयित साधे रुग्ण तपासणीसाठी येतील. त्यामध्ये सुरवातीच्या लक्षणात ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळल्यास त्या रुग्णांवर येथेच अलगीकरण करून प्रक्रुती ठणठणीत झाल्यावर घरी सोडण्यात येणार आहे. मात्र अतिशय व गंभीर आजारी असल्यास त्या रुग्णांना पनवेल येथे दक्षता म्हणून तातडीने हलविण्यात येइल. या रुग्णालयात दोनच व्हेंटिलेटर आहेत. पनवेल व एम.जी.एम.येथे या रुग्णांसाठी विशेष कोवीड दवाखाना उभारण्यात आला आहे. तेथे कोरोना संशयित रुग्णांसाठी अत्यावश्यक व आधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या रुग्णालयात ९५ पैकी केवळ ६५ कर्मचारी कार्यरत असून तब्बल ३० वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार सोसावा लागत आहे. वारंवार मागणी करून सुद्धा या ३० जागा गेल्या ५ वर्षापासून भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होऊन उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू ओढवत आहे. ही रिक्त पदे भरावीत म्हणून माणगांवातील लोकप्रतिनिधीनी आंदोलन, मोर्चे व निवेदन देऊनही अद्यापही वैद्यकीय अधिकारी व विविध सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडेच याबाबत खा. सुनील तटकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीमध्ये माणगांवसह रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत असे आदेश आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना दिले. मात्र मार्च २०२० पर्यंत आद्यपही ९५ पैकी ३० पदे रिक्त आहेत. त्यामुळे सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त जादा काम करावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. उच्च दर्जाच्या व आधुनिक पद्धतीच्या सुविधा व यंत्रणा नसल्याने अपघातातील रुग्णांना सरसकट मुंबई किंवा पुणे येथे हलवावे लागते. मुंबई, पुणे या ४ ते ५ तासाच्या प्रवासात वाहतुकीची कोंडी सातत्याने होत असल्याने अनेक रुग्णांची प्राणज्योत रस्त्यातच मावळते. या रुगणालायतील सिटीस्कॅन मशीन, सोनोग्राफी मशीन, लिफ्ट गेली ५ वर्ष बंद असल्याने रूग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन दामदुप्पट पैसे भरून उपचार करावे लागत आहेत. तसेच वैद्यकीय अधीक्षक वर्ग १, वैद्यकीय अधीक्षक वर्ग २(शस्त्रक्रिया), वैद्यकीय अधिकारी वर्ग २( बालरोगतज्ज्ञ) ही पदे काही वर्षांपासून रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकारी म्हणून स्त्री रोग व प्रसुती तज्ञ डॉ. गौतम देसाई हे गेली ५ वर्षापासून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. अशी महत्वाची पदे रिक्त असल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागत आहे. राज्य शासनाची १०८ ही रुग्णवाहिका सेवा असून नसल्या सारखी आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला मोफत सेवा मिळत नाही. या रुग्णालयात ४ रुग्णवाहिका आहेत. परंतु, बऱ्याच वेळा त्या बंद स्थितीत असतात. काही वेळा या रुग्णवाहिका चालू असल्यातर डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे गरीब व आदिवासी समाजाला याचा लाभ मिळत नाही. त्याचप्रमाणे ठराविकच औषधे व गोळ्या उपलब्ध असल्याने रुग्णांना इतर खाजगी औषधांच्या दुकानातून औषधे व गोळ्या विकत घ्याव्या लागत आहेत. या रुग्णालयाची इमारत जीर्ण झाली असून तिची दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक झाले आहे. पावसाळ्यात प्रसूती कक्षात ३ ते ४ फूट पाणी तुंबून त्याला तलावाचे स्वरूप येते. नव्या इमारतीचे उदघाटन खा. शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. मात्र ठेकेदाराने या इमारतीचा आराखडा सुनियोजित न केल्याने आणि ठराविक उंचीवर पाया बांधकाम न केल्याने दरवर्षी पाणी साचत आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. सध्या या रुग्णालयात कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. माणगांव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक क्षेत्रामध्ये कोरियन अधिकारी यांची चौकशी करून तपासणी केली जात आहे. जानेवारी पासून येथील कोणीही कोरियन नागरिक कोरियाला आला किंवा गेलेला नाही. त्यामुळे तेथे कोणताही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची योग्य ती आरोग्य तपासणी केली जात आहे. कोणताही रुग्ण कोरोनाग्रस्त संशयित म्हणून आढळलेला नाही असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गौतम देसाई यांनी सांगितले.

Popular posts from this blog