सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व अलिबाग पोलीसांची संयुक्त कारवाई
रायगड (किशोर केणी) :
सध्या "कोरोना (कोव्हीड-19) विषाणू" प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्याकरीता घोषित केलेल्या "संचारबंदी" काळात ए.पी.एल./बी.पी.एल. व अन्न सुरक्षा नियमान्वये शिधापत्रिका धारकांना सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानांमार्फत शासनाकडून स्वस्त दरात धान्य विक्री केली जात आहे. परंतु काही सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान मालक स्वतःचा अवाजवी आर्थिक फायदा करुन घेण्याकरीता अशा आणीबाणीच्या प्रसंगीसुध्दा शासनाकडून शिधापत्रिका धारकांना वाटप करण्याकरीता त्यांचे ताब्यात देण्यात आलेले धान्य हे शिधापत्रिका धारकांव्यतिरिक्त इतर लोकांना अधिक दराने विक्री करीत असल्याची माहिती श्री. अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक, रायगड यांना मिळाली. सदर माहिती खातरजमा करुन, असे गैरकृत्य करणाऱ्या इसमांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार श्री.जे.ए.शेख, पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अधिकारी-अंमलदार यांची जिल्ह्यात पथके नेमून शासनाकडून शिधापत्रिका धारकांना 'तांदूळ', 'गहू', इत्यादी जिवनाश्यक वस्तुंचा शासकीय दराने पुरवठा करणे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानांना बंधनकारक असतानासुध्दा काही दुकान मालक-कामगार असे मिळून त्यामध्ये गैरव्यवहार करीत असून अशा प्रकारे काळा बाजार करणाऱ्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांची गोपनिय बातमीदारामार्फतीने माहिती घेवून संबंधीतांविरुध्द गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 11/04/2020 रोजी 17.00 वा. सुमारास 04 आरोपी पैकी आरोपी न. 1) प्रवीण रामचंद्र रणवरे रा. रामनाथ, ता. अलिबाग व आरोपी न. 2) रामचंद्र शंकर रणवरे रा. रामनाथ यांनी संगमत करून सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ ही जीवनावश्यक वस्तू शिधापत्रिका धारकांनाच प्रती किलो 3 रुपये दराने विक्री करण्याचा शासन नियम असुनही वरील दोन्ही आरोपींनी संगनमताने शिधापत्रिकेशिवाय लाभार्थी नसलेल्या आरोपी न.3 नामे अमीर गुलाम हुसेन जमादार वय-48 रा. चेंढरे, पंतनगर ता. अलिबाग यांना स्वत:च्या फायद्याकरिता काळा बाजार करून ते तांदूळ प्रती किलो 10 रुपये दराने बेकायदेशीर विक्री केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे गुर.न. 62/2020 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ हे करीत आहेत. सदर गुन्ह्यात एकूण 51,000/- रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरच्या कारवाईचे माध्यमातून अशा आणीबाणीच्या प्रसंगी शासनाने पारित केलेल्या आदेशांची जाणिवपूर्वक पायमल्ली करुन जिवनावश्यक वस्तूंची काळया बाजाराने विक्री करणाऱ्यांबाबत माहिती असल्यास त्याबाबतची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला अगर पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्याचे रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे समस्त नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे. सदरची छापा कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख व अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे व त्यांच्या पथकाने केली आहे.