जीवनाश्यक वस्तूंची काळ्या बाजाराने विक्री करणाऱ्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
रायगड (किशोर केणी) :
सध्या कोरोना (कोव्हीड-19) विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण घालण्याकरीता घोषित केलेल्या संचार बंदी काळात शिधापत्रिकाधारकांना सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानांमार्फत शासनाकडून स्वस्त दरात धान्य विक्री केली जात आहे. परंतु काही सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान मालक स्वतःचा अवाजवी आर्थिक फायदा करुन घेण्याकरीता अशा आणीबाणीच्या प्रसंगीसुध्दा शासनाकडून शिधापत्रिका धारकांना वाटप करण्याकरिता त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले धान्य हे शिधापत्रिका धारकांव्यतिरिक्त इतर लोकांना अधिक दराने विक्री करीत असल्याची माहिती श्री. अनिल पारस्कर पोलीस अधीक्षक रायगड यांना मिळाली. सदर माहिती खातरजमा करुन असे गैरकृत्य करणाऱ्या इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश श्री. जे. ए. शेख पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग यांना दिले होते. त्यानुसार श्री. जे. ए. शेख पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या गोपनीय बातमीदारां मार्फतीने खात्रीशिर माहिती प्राप्त केली असता सासवणे, ता. अलिबाग येथील अधिकृत सरकारमान्य स्वस्त धान्य विक्रेते व कामगार 1) महेश शंकर ठाकूर रा. दिघोडी, पो. सासवणे, ता.अलिबाग 2) महेंद्र अमरनाथ ठाकूर
रा. खिडकी-कोपर, ता. अलिबाग हे त्यांच्या ताब्यातील धान्याची शिधापत्रिकाधारकांव्यतिरिक्त इतर लोकांना अधिक
दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. जे. ए. शेख यांनी अलिबागचे प्रभारी पुरवठा निरीक्षक श्री. संदिप पामनंद तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदार अशा खास पथकाची नेमणूक करुन त्यांना मिळालेल्या बातमीची माहिती देऊन छापा कारवाईच्या सचना दिल्या.
त्यानुसार सदर कारवाई करीता नेमलेल्या पथकाने वर नमुद सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात धान्य खरेदी करिता 'बनावट ग्राहक' पाठवून धान्याची मागणी केली असता दुकानात हजर असणारा महेश शंकर ठाकूर याने दुकान मालक महेंद्र अमरनाथ ठाकर यांच्या सांगण्यावरून संगनमताने शिधापत्रिके शिवाय बनावट ग्राहकास तांदूळ या जिवनाश्यक वस्तुचा 03/-रू. प्रति/कि.ग्रॅम असा सरकारी दर असताना त्याची 20/-रू. प्रति/कि.ग्रॅम दराने विक्री करत असताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. नमूद इसम 1) महेश शंकर ठाकूर रा. दिघोडी, पो. सासवणे, ता.अलिबाग 2) महेंद्र अमरनाथ ठाकूर, रा. खिडकी-कोपर, ता.अलिबाग यांच्याविरूद्ध मांडवा सागरी पोलीस ठाणे कॉ. गु. रजि. नं. 25/2020 जिवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 सह भा.दं.वि.कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मांडवा सागरी पोलीस ठाणे करीत आहे. सदरची छापा कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अनिल पारस्कर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन गुंजाळ यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख, पोलीस हवालदार/2031 श्री. पिंपळे, श्री. चिमटे, श्री. कराळे, श्री. म्हात्रे या पथकाने केली आहे.