गावकऱ्यांनी बंद केलेले रस्ते तात्काळ मोकळे करण्याचा पोलीस पाटील व सरपंच यांना रायगड पोलीस अधीक्षकांचा सक्त आदेश
स्थानिक पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या माध्यमातून बंद केलेले रस्ते तात्काळ मोकळे !!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : संपूर्ण जगात महामारीने हाहाकार माजवणार्या कोरोना व्हायरस या महाभयंकर विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी आपापल्या गावाच्या प्रवेश द्वारावर मोठमोठे दगड गोटे, बांबू आणि काटेरी कुंपण घालून गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना व गावातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींना आणि वाहनांना येजा करण्यासाठी बेकायदेशीरपणे प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाची आणि कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी पुरवण्यात येणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन व्यवस्थापन प्रक्रियेत प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे मनमानी करून गावपातळीवर ग्रामस्थांनी निर्णय घेणे बेकायदेशीर आहे.
केवळ रस्ते बंद करण्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखता येतो असे नाही तर शासनाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या संसर्गजन्य रोगाचे संक्रमण व संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ सोशल डिस्टन्सेस, मास्कचा वापर, सॅनिटाइजरने वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दी करणे, गर्दीत न जाणे, प्रवास टाळणे, एक दुसर्या पासून विशिष्ठ अंतरावर राहणे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, सर्दी खोकला आणि ताप इत्यादी लक्षणे जाणवल्यास तात्काळ दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेणे इत्यादी सूचनांचे पालन करणे या बाबी महत्वपूर्ण आहेत. म्हणून शासनाने दिलेल्या सूचना पाळा आणि कोरोना टाळा असे सर्वत्र म्हटले जात आहे.
सदर वास्तव पत्रकारांनी आपल्या वास्तववादी प्रासंगिक बातम्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासकीय अधिकारी यांनी विभागीय प्रशासकीय यंत्रणेला ग्रामीण भागात संबंधित ज्या ज्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी अशा प्रकारे ग्रामीण रहदारीचे रस्ते बेकायदेशीरपणे गावबंदीच्या नावाखाली बंद केले आहेत ते त्या गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांना तसे सक्त आदेश देऊन यांच्या माध्यमातून तात्काळ मोकळे करावे अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेश पारीत करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ठिकठिकाणचे पोलीस पाटील आणि सरपंच यांनी सदर बंद केलेले रस्ते तात्काळ मोकळे केले आहेत.