लोकवसाहतीतून नदीत जाणाऱ्या प्रदुषित पाण्याचा विचार करुनच काळ नदीवर बंधारा बांधण्याची मागणी


माणगांव (प्रतिनिधी) :-
खासदार सुनिल तटकरेंच्या प्रयत्नांतून माणगांवच्या काळ नदीवर आता बंधारा बांधकाम होणार आहे. माणगांव शहराला पिण्याचे शुध्द पाणी पुरविणाऱ्या काळ नदीपात्रात शहरातील मोठ्या वसाहतीतून येणारे प्रदुषित सांडपाणी विचारात घेऊनच बंधारा बांधण्याची जनतेची मागणी आहे. कारण असे की, काळ नदीवरील रेल्वेपुल उतेखोल जुन्या तहसिल पाठीमागील जॅकवेलपर्यंत पाण्याचा मोठा साठा अजूनही प्रदुषण विरहीत आहे. त्यापलिकडे मात्र नदीपात्रा जवळील वाढत्या वसाहतीतून निघणारे सांडपाणी शहरात योग्य सांडपाणी निचरा व्यवस्थेच्या अभावामुळे दुर्दैवाने सोडले गेल्याचे चित्र सुस्पष्ट आहे. मात्र अजूनही वाकडाई मंदिर परिसराकडील सध्या वापरात असलेल्या जॅकवेल जवळ शुध्द पाण्याचे डोह सुरक्षित आहेत.


हे डोह उन्हाळ्यापर्यंत प्रदूषण विरहित राहतात. येथूनच पाणी पंपाद्वारे उचलून शुध्दीकरणासाठी उतेखोल येथील केंद्रात आणले जाते व संपूर्ण शहराला पुरविले जाते. याच सुरक्षित ठिकाणी वर्षभर पाणीसाठा राहण्यासाठी, शहरातील वाढत्या वसाहती लक्षात घेता माणगांवकरांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. हा बंधारा अन्यत्र बांधणे अयोग्य ठरेल अशी जोरदार चर्चा आहे. याला कारण असे की, बंधारा जुने माणगांव कुंभारवाडा पुलाच्या पलिकडे बांधावा असे काही जणांचे म्हणणे आहे. या विषयी नगरपालिकेतील नगरसेवकांमध्येच एकमत नसल्याची चर्चा आहे. याबाबत माणगांव नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंदशेट यादव यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधी यांनी संपर्क साधून विचारले असता त्यांनी हा बंधारा नक्की कुठे बांधायचे याबाबतचे ठिकाण ठरलेले नसून संबंधित तज्ञांच्या अभ्यासानुसारच तो बांधण्याात येईल असे सांगितले आहे.

बंधारा हा माणगांव नगरपालिकेसाठी उपयुक्त ठरावा. अन्यत्र ठिकाणी नवीन बंधारा विषयक नव्याने मागणी करावी असे माणगांवकरांचे म्हणणे आहे. तसेच याविषयी पाणीपुरवठ्याची अभ्यासपूर्ण माहिती असलेले तत्कालीन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अनंता थळकर यांच्या जवळ  विचारले असता त्यांनी सांगितले की, सर्वच विद्यमान नगरसेवकांनी तत्कालिन ग्रामपंचायत माजी पाणीपुरवठा सभापती अरुण पवार तसेच इतर माहितगारांशी एकत्रित सल्लामसलत करुनच बंधारा उतेखोल येथेच बांधणे योग्य ठरेल. कारण लोकनेते अशोकदादा साबळेंच्या स्वप्नातील माणगांवकरांची ही फार दिवसांपासूनची मागणी आहे.

काळप्रकल्प कालव्याच्या पाण्यामुळे आजवर माणगांवकरांना पिण्याच्या पाण्याचा म्हणावा तितकासा प्रश्न निर्माण झालेला नाही. मुबलक पाणी आहे. परंतु दिवसेंदिवस वाढते उष्णतामान व सुरक्षित पाणीसाठे, बंधारे यांच्या  समस्यांमुळे पाणीटंचाई गेल्या एक-दोन वर्षांपासून गंभीर होत चालली आहे. नदीच्या पाण्याची पातळी लवकरच खालावते. बंधाऱ्यामुळे ही समस्या काही प्रमाणात सोडविणे माणगांवकरांच्या दृष्टीकोनातून सोयीचे ठरेल. याठिकाणी कोणतेही राजकारण न करता हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा पाण्याचे सुख असलेल्या माणगांवात पाणी-पाणी करण्याची पाळी येऊ नये म्हणूनच माणगांवकरांची ही मागणी महत्त्वाची आहे.

Popular posts from this blog