माणगांव उप जिल्हा रुग्णालयात आदिवासी बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
दोष ना कुणाचा, जनभावना संतप्त!
माणगांव (प्रतिनिधी) :
माणगाव तालुक्यातील निवी येथील ३ वर्षीय आदिवासी बालिका अंजली हरिश्चंद्र वाघमारे हिचा उप जिल्हा रुग्णालय माणगांव येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. एकविसाव्या शतकात पुरोगामी प्रगतशील राज्यात उप जिल्हा रुग्णालयाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह असून दोष कुणाला द्यावा? असा सवाल निर्माण झाला आहे. नविन विकासकाम नकोत आधी आहे ते रुग्णालय सुधारा. शासन संवेदनाहीन झाले आहे काय? अस विचारण्याची पाळी हतबल जनतेवर आली असून जनभावना संतप्त झाली आहे. रुग्णालय असूनही उपचारासाठी मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणी जावे लागते याबाबत शासन कधी लक्ष वेधणार?
या बाबत सविस्तर वृत्त असे कि माणगाव तालुक्यातील निवी येथील ३ वर्षीय आदिवासी बालिका अंजली हरिश्चंद्र वाघमारे ही खेळत असताना तिला काहीतरी चावले म्हणून तिने तिच्या वडिलांना सांगितले असता, वडिलांनी तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे सकाळी ११.१५ वा. घेऊन आले. येथील डॉ. अमर बारोट यांनी तिच्यावर उपचार सुरू केले. सकाळी ११.३० वा. १०८ ला त्यांनी पाचारण केले. डाॅक्टरांचे म्हणने असे आहे कि ती मुलगी बेशुध्द अवस्थेत असताना तिचे वडिल तिला येथे घेऊन आले, मुलगी अर्धा तास आधी पासून काहीही बोलत नव्हती असे तिच्या वडिलांनी सांगितले होते.
डाॅक्टरांनी तपासले असता तिची नाडी मिळत नव्हती ऑक्सिजनचे नाॅर्मल लेवल पेक्षा प्रमाण फारच कमी होते तिला श्वसनलिकेत इन्ट्युबेशन ट्युब टाकुन रेस्पीरेटरी सिस्टीम चालू केले सगळे ट्रिटमेंट प्रोटोकाॅल प्रमाणे फाॅलो करुन उपचार केले १०८ रुग्णवाहीका येई पर्यंत इन्ट्युबेशन चालू ठेवले मुलगी फारच सिरियस होती. सकाळी ११.३० वा. १०८ ला त्यांनी पाचारण केले होते. रोहा येथील १०८ ही रुग्णवाहिका एक तासाने १२.१५ ला रुग्णालय माणगांव येथे दाखल झाली होती. एक तास १०८ वरील डॉक्टरही उपजिल्हा रुग्णालयात पेशंट बरोबर होते. अखेर १.४५ वाजता ती मृत झाली.
ऑक्सिजनचे प्रमाण कमी प्रकृती गंभीर असल्याने बालिकेस पुढे नेण्यास १०८ च्या डॉक्टरने नकार दिला. ही पेशंट स्टेबल करून द्या असे सांगितले दरम्यान तिचा मृत्यू झाला. आदिवासी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपजिल्हा रुग्णालयात १०८ रुग्णवाहिका आधी पासून उपलब्ध असूनही ह्या रुग्णवाहिकेवर पूर्ण वेळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णाला पुढील उपचारासाठी नेता आले नाही. येथे १०८ रुग्णवाहिकेची नेहमीचीच बोंब आहे. असे अनेकदा घडत असून सुद्धा १०८ कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष आहे असे येथील लोक बोलतात.
माणगांवचे उप जिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अद्यावत सोयी सुविधांची वाणवा औषधे, अँटीडोस इंजेक्शन्सची प्रसंगी कमतरता किंवा उपलब्धच नसणे आणि गंभीर आजार, सर्पदंश, अपघाती आपात्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी अत्याधुनिक क्षमतेचा अभाव केवळ मलमपट्टी प्रथमोपचार करुन पुढील उपचारा करीता पेशंटला येथुन पुढे हालविणेस सांगणे, यामुळे अनेकांना पुढील उपचारा साठी जाताना आपले प्राण गमवावे लागत आहेत. पेशंटचे नातेवाईक आणि जनतेला त्रास सहन करण्याची पाळी येते असे नेहमीचेच चित्र झाले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला महागडे वैद्यकिय उपचार परवडणारे नाहीत. सरकारी रुग्णालयात अशी अवसान घातकी अवस्था, जीव गमाविण्या पलिकडे पर्याय उरला नाही. रुग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा तज्ञ डाॅक्टर सर्वसोयींनीयुक्त जनसेवे साठी रुग्णालय सुसज्ज करावीत ! अशी जनतेची गेले अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालीका, वाढती आजारपण आणि महागडे वैद्यकिय उपचाराने जनता हैराण आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या गंभीर समस्ये विषयी लक्ष वेधावे अशी जनतेची मागणी आहे.