केंद्रात भाजपला आम्ही पुरून उरतो - खा. सुप्रिया सुळे 

मंत्रिमंडळात आदिती तटकरेंचा विकास कामात प्रथम क्रमांक, प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वी


माणगांव (उत्तम तांबे) :- 
केंद्र सरकारमध्ये भाजपचे ३०३ खासदार आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत. आमच्या महाघाडीचे केवळ जवळपास १०० खासदार आहेत. परंतु, भाजप सरकारला महाआघाडी पुरून उरते. दिल्लीमध्ये गेले १० दिवस अधिवेशन सुरू आहे. परंतु गेले १० दिवस संसदेत कोणत्याही प्रकारचे कामकाज झाले नाही. दिल्लीत झालेल्या दंगलीचे उत्तर गृहमंत्री अमित शहांनी द्यावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने केली. परंतु, अमित शहा उत्तर द्यायला तयार नाहीत. हे लोकशाहीमध्ये घातक आहे. भारतात एक वेगळ्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळेच ते उत्तर देऊ शकले नाहीत. असा दावा खा. सुप्रियाताई सुळे यांनी माणगांव येथे झालेल्या शनिवार दि. ७ मार्च रोजी महिला दिनानिमित्त झालेल्या दक्षिण रायगड महिला मेळाव्यात केला.

त्यांनी भाजपवर सडेतोड टीका केली. दिल्लीतील दंगलीना कोण जबाबदार आहे हे सरकार सांगू शकत नाही. ही सरकारची जबाबदारी आहे. या दंगलीमध्ये ५० जणांचा बळी गेला. हे दुर्दैवी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आलेले असताना अचानकपणे दिल्लीमध्ये दंगल होते. कोणताही पाहुणा आला असता घरामध्ये शांतता असावी लागते. परंतु, दिल्लीमध्ये नागरिकत्व कायद्या संदर्भात दंगल घडवून आणली जाते. त्यांचे कोणीही समर्थन करू शकणार नाही. परंतु, या दंगलीत नाहक बळी गेलेले आहेत. याला जबाबदार भाजप सरकार आहे. असे ठणकावून सांगितले. त्यांची जबाबदारी भाजप सरकारने घेऊन त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करावी असे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

राज्यात महाविकासघाडीचे सरकार आहे. हे सरकार धर्म निरपेक्ष तत्वावर चालणारे सरकार आहे. या राज्यात महिलांवर अत्याचार होऊ देणारे नाही. तशी खंभिर पाऊले उचलत आहोत. पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब यांनी महिलांसाठी निवडणुकीमध्ये ५०% आरक्षण आणून मोठी क्रांती केली आहे. सर्व स्तरावर महिलांचे सक्षमीकरण झाले आहे. आज पुरुषांच्या बरोबरीने सर्व स्तरातून महिला आघाडीवर आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. आदिती तटकरे यांनी राज्यमंत्री मंडळात १०० दिवस पूर्ण केलेत. त्यामध्ये ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. ती महाराष्ट्रभर फिरून लोकांच्या समस्या जाणून घेऊन विकासकामे करीत आहे. एक महिला घर जोडण्याचे काम करीत असते. तसेच काम आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पक्षाचे संघटन करीत आहे. त्यांचा अभिमान पक्षाला आहे.

रायगड जिल्ह्यात बहुतेक सर्व पदांवर महिला काम करीत आहेत. यांचा रास्त अभिमान मला आहे. पक्षाच्या माध्यमातून सर्वांनी अशाच प्रकारचे काम करणे गरजेचे आहे. आमदार, जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, सभापती, नगराध्यक्ष, पोलीस उपनिरीक्षक या सर्व पदांवर महिला म्हणून उत्तमरीत्या काम करीत आहेत. खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात महिला राज सुरू आहे. मात्र खा. सुनील तटकरे यांना पुरुष म्हणून आणि बारामतीतून मला निवडून दिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानते. राज्यामध्ये भाजपचे १०५ आमदार निवडून येऊन सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर मित्र पक्ष मिळून महाविकासआघाडी बनवून राज्यात सत्ता आणण्याचे काम एकमेव शरद पवारच करू शकतात. त्यांनी आदिती तटकरे यांना ८ खात्यांची जबाबदारी देऊन महिला सक्षम आहेत. हे दाखवून दिले आहे. त्यामुळे अनिकेत तटकरे यांचा मंत्री होण्याचा मान हुकला आहे.

या कार्यक्रम प्रसंगी राज्यमंत्री तथा पालक मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की या  ठिकाणी महिला हळदीकुंकू कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता संघटना वाढीचे काम करीत आहेत. येथील महिला लोक प्रतिनिधी, महिला कार्यकर्ता वेगवेगळ्या प्रकारचे चांगले महिला उपयोगी उपक्रम राबवत आहेत.

माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आर्थिक संकल्पात एक हजार कोटीची तरतूद महिला बचत गटातील वस्तू खरेदीसाठी केली आहे. तरी महिलांनी आपले बचत गट सक्षम करावे. नगरपंचायत , नगरपालिका याच्या मूलभूत गरजा न साठी विशेष निधी केली आहे. तसेच या वेळच्या आर्थिक संकल्पात कोकण विभाग पर्यटनास झुकते माप दिले आहे त्या बद्दल आजितदादा चे मी  विशेष आभार मानते.
 जेव्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्याच्या संघटनेचा अहवाल मागतील, जर १५० पानांचा राज्याचा अहवाल असेल तर त्यातील १०० पांनच अहवाल महिला संघटनेचा असेल. अश्या पद्धतीचे काम आपल्या महिलाना करायचे आहे.

रायगड जिल्ह्यात रखडलेला आणि बॅ. अंतुले यांचा स्वप्नातील रेवसरेड्डी मार्ग येत्या ३ वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. कोकणातील चार भारतरत्नांचे स्मारक एकत्रित दापोली येथे होणार आहे. त्याची तरतूद अर्थसंकल्पामध्ये अजितदादा पवार यांनी केली आहे. माणगांव शहरात कोकणातील ५० कोटी अंदाजित खर्चाचे भव्यदिव्य क्रीडा संकुल होणार आहे. माणगांवातील नाट्यगृहाचे काम सुरू झाले आहे.  इतर सर्व विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन खा. सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात दिले.

या कार्यक्रमाला खा. सुनील तटकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी आ. सुरेश लाड, आ. अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा अध्यक्षा गीताताई  पालरेचा, महाराष्ट्र राज्य महिला चिटणीस दिपिका चिपळूणकर, संगीता बक्कम, सभापती अलका जाधव, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, प्रभाकर उभारे, तळा समाज कल्याण सभापती गीता जाधव,अपेक्षा कारेकर, शेखर देशमुख,  मुक्तार वेळासकर, आनंद यादव, महादेव बक्कम, महमूद धुंदवारे, सर्व नगरसेवक  आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts from this blog