नगरपंचायत सूचनांचे नागरिकांनी पालन करावे
माणगांव नगराध्यक्ष योगिता चव्हाण यांचे आवाहन
माणगांव (उत्तम तांबे) :
माणगाव नगर पंचायत सर्व नागरिकांना महत्वपूर्ण सूचना
माणगांव शहरातील किराणा/भाजी या अत्यावश्यक सेवा सकाळी ९.०० ते ११.०० पर्यंत तसेच संध्याकाळी ४.०० ते ६.०० पर्यंत सुरू राहतील त्या ठिकाणी कोणालाही गर्दी करता येणार नाही, सुरक्षित अंतर ठेवून रांग लावून खरेदी करावी तसेच १४४ अंतर्गत होणारी कार्यवाही टाळण्यासाठी हे पाऊल आपल्या सेवेसाठी घेण्यात येत आहे सहकार्य करावे. तसेच माणगांवातील प्रत्येकाने आपल्या घरी नव्याने आलेल्या व्यक्तीबाबत पूर्ण ती माहिती प्रशासनाला त्वरित देण्यात यावी, जरी ती व्यक्ती तुमचे पाल्य, पालक, भाऊ, बहिण, मित्र, नातेवाईक असली तरी त्याबाबत जवाबदारीने नगर पंचायत/पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी, अशी माहिती लपवून ठेवणाऱ्या व्यक्ती/कुटुंबावर योग्य ती कारवाई केली जाईल. ह्या तत्परतेने तुम्ही केवळ त्या व्यक्तीला नाही तर तुमच्या स्वतःच्या कुटूंबाला तसेच माणगांवच्या जनतेला कोरोना ह्या असाध्य आजारापासून वाचवू शकता.
आपल्या माणगांवला कोरोना विरहीत ठेवण्यासाठी मोलाचे सहकार्य करू शकता. तुमचे एक सत्य सर्वांना ह्या कोरोना पासून दूर ठेवू शकते. अशा प्रकारे सूचना, दवंडी, संदेश देण्यात आले असून नगराध्यक्ष योगिता गणेश चव्हाण यांनी माणगांवकरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू संपला म्हणून झुंडीच्या झुंडीने बाहेर पडून जल्लोष करु नका. 'दिवसभरात कमवलं आणि रात्रीत गमावलं !' अशी परिस्थिती पून्हा नको व्हायला. आपण सर्व माणगांवकर नागरिकांनी कालच्या जनता कर्फ्यू ला प्रचंड प्रतिसाद देत कर्फ्यु यशस्वी केलात त्याबद्दल आपले आभार. मा. मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात काल मध्यरात्री पासून कलम १४४ (संचारबंदी) लागू होत असल्याचे जाहीर केले आहे. जनता कर्फ्यु प्रमाणेच आपले सहकार्य पुढील काही दिवस आवश्यक आहे. "Covid19" या आजाराला आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने हरवू शकतो. आपले सहकार्य असेच असावे असे त्यांनी म्हटले आहे.