माणगांव तालुक्यासह ग्रामीण भागातील जनतेने कोवीड-१९ चे संक्रमण रोखण्यासाठी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तालुक्यातील सर्व रस्ते घेत आहेत मोकळा श्वास
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : जीवघेण्या 'कोरोना' या विषाणूने जगभरात धुमाकूळ घालून आपल्या भारत देशात प्रवेश केला असून संपूर्ण देशात दहशत निर्माण करणाऱ्या कोवीड-१९ या विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहना नुसार रविवार दि. २२ मार्च २०२० रोजी संपूर्ण माणगांव शहरासह ग्रामीण भागात शासन आदेशाचे तंतोतंत पालन करून व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने आपला व्यवसाय बंद करून १४ तासांच्या 'जनता कर्फ्युचे' पालन केल्याचे दिसून आले.
संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या प्राणघातक अशा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देश आणि राज्य स्तरावर युद्धपातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाच्या या आवाहनाला माणगांव शहरासह संपूर्ण ग्रामीण भागातही १००% प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व जनतेसह ग्रामीण भागातील भोळीभाबडी जनता, शेतमजूर, शेतकरी यांनाही कोरोना विषाणूच्या राक्षसी अवताराचे महत्त्व कळल्याने आपला दैनंदिन कामधंदा सोडून आपल्या कुटूंबासोबत आपल्या घरीच बसून विश्रांती घेत असल्याचे दिसून येत आहे.
एरवी नेहमीच माणगांव शहरातील आणि संपूर्ण ग्रामीण भागातील रस्ते चारचाकी, दुचाकी व पादचाऱ्यांच्या वर्दळीने गच्च भरुन गोंगाट करणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो आहे. माणसांच्या आणि वाहनांच्या वर्दळीने गुदमरलेल्या रस्त्यांना मात्र २२ मार्चच्या 'जनता कर्फ्युने' मोकळा श्वास घेता आला. कोरोना विषाणू हा अतिघातक संसर्गजन्य रोग असून हा जीवघेणा रोग एका व्यक्तीच्या स्पर्शाने दुसऱ्या व्यक्तीस, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होऊ शकतो. ही संसर्गजन्य रोगाची संक्रमण साखळी तोडून पसरत असलेला संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने जारी केलेला 'जनता कर्फ्यू' हा एक मोठा भाग आहे. त्यासाठी हा एकच दिवस नाही तर पुढील पाच दिवस सुद्धा आपण बंद पाळल्यास खऱ्या अर्थाने कोरोना विषाणूचा सामना ठरेल.
एकमेकांना आलिंगन देणे, हातात हात घालून नमस्कार करणे, एकत्र नागरिकांचा समूह जमविणे या सर्व बाबी टाळून सर्वांनी मास्क बांधणे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे, घरात व परिसरात स्वच्छता राखावी. शक्यतो घरात बसूननच 'कोरोना' रोगाशी सामना करणे. तसेच आरोग्य विभाग व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे. बाकी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःच्या आरोग्याची स्वतःच काळजी घेणे आणि प्रशासनाला वेळीच सहकार्य करणे असे प्रशासनाला अपेक्षित आहे.