कोरोना व्हायरस प्रतिबंधनात्मक तयारी साठी माणगाव तालुका प्रशासन सज्ज
माणगांव (प्रतिनिधी) :
सध्या जगात भीषण धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यसरकार आटोकाट प्रयत्नाला लागले आहे आणि त्यामुळे स्थानिक प्रशासनाला तशा प्रकारचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि त्या आदेशांची अंमलबजावणी माणगांव तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमार्फत कटीबद्धतेने पार पडत असल्याचे दिसुन येत आहे.
आमच्या प्रतिनिधींनी माणगांव तालुक्यातील विविध सार्वजनिक कामकाजाची कार्यालये व लोक एकत्रित जमतात त्या वर्दळीच्या स्थळांना भेट दिल्यानंतर समजले की, माणगांव बसस्थानकात शुक-शुकाट जाणवत होता. माणगांव स्थानकात दररोज सुमारे 2000 प्रवासी चढ-उतार करतात. माणगांव आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांच्या माहीतीप्रमाणे सध्या प्रत्येक बसमध्ये 20 प्रवासी सोडले जात आहेत. माणगांव आगाराच्या पुणेकडे जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. सर्व बसेसच्या एकूण 431 फेऱ्या असतात. 20 मार्चपर्यत 125 फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. 21 मार्च पर्यंत बंद फेऱ्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक बस ही लिक्वीड सोफ ने धुवून बाहेर सोडली जात आहे.
आगारातील आणि बसस्थानकातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केले गेले आहे. सर्व कर्मचाऱ्यां एकूण 100 मास्क वाटप करण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे कोरोना संशयित रुग्णांसाठी आयसोलेशन विभाग तयार करण्यात आल्याचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. जी. के. देसाई व सहकारी डॉ. तुषार यांनी सांगितले. तसेच खाजगी प्रवासी वाहतुक संघटना देखील प्रशासनाच्या आदेशांचे पालन करत आहेत
माणगांव बाजारपेठेत नेहमीप्रमाणे लोकांची वर्दळ जाणवत नव्हती. बाजारपेठेत मास्क आणि सैनिटायझरची मागणी वाढली असल्याचे सर्जिकल साहित्य विक्रेत्यांकडून समजत आहे. तसेच माणगांव पोलीस प्रशासन हे 22 मार्च चा जनता कर्फ्यू आणि कोरोनो प्रतिबंधासाठी तयार असल्याचे डी वाय एस पी श्री. शशिकिरण काशिद व माणगांव पोलिस निरिक्षक श्री. रामदास इंगवले यांनी सांगितले आहे. तसेच माणगांव नगरपंचायत स्वच्छता आणि कोरोना प्रतिबंधासाठी तत्पर असल्याचे मुख्याधिकारी श्री. राहुल इंगळे यांनी सांगितले. माणगांव तहसिलदार प्रियांका आयरे, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर यांनी सर्व प्रशासन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तत्पर असल्याचे सांगितले आहे.
एकंदरीत कोरोना प्रतिबंधासाठी माणगांव तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांचे कार्य कौतुकास्पद आहे.