वरसे परिसरात अवैध माती उत्खनन भराव !
रोहे (किरण बाथम) :
रोहा तालुक्यातील वरसे परिसरात येणाऱ्या निवी गावाच्या हद्दीत बेकायदेशीर माती भराव सुरू असल्याचे दिसत असूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कारण ज्या जागेतून हे माती उत्खनन होत आहे ती जागा महसुल विभागात प्रतीबंधीत ३५ सेक्शन अंतर्गत येते. जागेच्या सातबाऱ्यावर ३५ सेक्शन लागले असताना माती जेसीबीने कशी काढली जाते? हा गहन प्रश्न आहे.
सदर जागेवरुन अनेक वेळा राञी व अपरात्री मातीची बेसुमार चोरी केली जात आहे. वरसे ग्रामपंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या खाजगी इमारतीच्या बांधकामाना हीच माती पुरवली जात आहे. अशा अवैध बांधकाम तसेच माती चोरीच्या या गंभीर प्रकाराकडे महसूल विभाग स्पष्टपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे. या परिसरात माती चोराचा फावले आहे असे बोलले जात असून या संबंधित महसूल विभागाने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या अगोदर देखील वराठी परिसरात अवैध माती उत्खनन सुरु होते. त्या मातीने रोहा शहरात झालेल्या माती भरावामुळे तालुक्यात खळबळ माजली होती. तेव्हा देखील "तो" प्रकार तहसीलदार कविता जाधव यांना जागृत पत्रकारांनी सुट्टीचा दिवस असूनही कळवला होता.
सध्या असेच सुट्टीचे दिवशी २ ते ३ डंपर गाडीने माती वाहतुक सुरूआहे. या परिसरात अवैध माती उत्खनन प्रकरणी रोहा तहसिलदार यांनी सखोल चौकशी करून रोहा महसूल विभागाने नोंद घेऊन कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.