नवयुवक मित्रमंडळ खांदाड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव
माणगाव (उत्तम तांबे) :
सोनभैरव ग्रामस्थ मंडळाच्या सहकार्याने नवयुवक मित्रमंडळ खांदाड यांच्यातर्फे तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. हे मंडळ यावर्षी चौथ्या वर्षात पदार्पण करीत असून या मंडळाचे अध्यक्ष महेश पवार तसेच ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानदेव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली या जयंती महोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते.
खांदाड गावामधील ग्रामदैवत सोनभैरव मंदिर व मारूती मंदिर येथे नवयुवक मित्र मंडळातर्फे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर जाऊन "जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो" अशा गगनभेदी घोषणा देऊन छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवज्योत आणण्यात आली. या शिवज्योतिचे माणगाव बाजारपेठेतून ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मिरवणूक काढण्यात आली.
रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड जिल्ह्यात आम्ही जन्माला आलो हे आमचे भाग्य आहे. नवतरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन, सामाजिक कार्य करून प्रगतभावी आयुष्य घडवावे व खांदाड गावचे नाव उज्वल करावे असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानदेव पवार तसेच काशिराम पोवार यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केले. या जयंती उत्सवाप्रसंगी सोनभैरव खांदाड ग्रामस्थ, महिला व शिवभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते .