सरकारी रुग्णालयाच्या सुधारणेसाठी डाॅक्टर म्हणजे धन्वंतरी देवाच्या आशिर्वादाची गरज 

सरकारी रुग्णालयाकडे पुढाऱ्यांचे दुर्लक्ष, डाॅक्टरांनी लक्ष घालावे अशी सूचक जनभावना 



माणगांव (प्रतिनिधी) : 
माणगांवातील बहुतेक नामांकित डाॅक्टर आणि त्यांचे दवाखाने, हाॅस्पिटल्स यांचा माणगावातील सरकारी रुग्णालय म्हणजेच उप जिल्हा रुग्णालयाशी घनिष्ठ संबंध आहे. हा केवळ योगा योग नसून वास्तव आहे. कारण माणगांवच्या सरकारी रुग्णालयापासून आपल्या डाॅक्टरी पेशाची सुरुवात करणारे अनेक डाॅक्टर आजमितिस येथेच नावारुपाला येवून स्वतःचे दवाखाने-हाॅस्पीटल्स बांधून जनसेवा करीत स्थिरावले आहेत. सध्या त्याच सरकारी रुग्णालयाची अवस्था बिकट आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु त्याचा लाभ गोरगरीब जनतेला होत नाही. सरकारी रुग्णालयाकडे पुढाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, आता डाॅक्टर तुम्हीतरी लक्ष घाला ! अशी सूचक जनभावना व्यक्त होत आहे. ही सर्व डाॅक्टर मंडळी खऱ्या अर्थाने देवदूत म्हणजेच धन्वंतरी देवच आहेत, अस म्हटल तरी वावगं ठरू नये असं जनमत आहे.

आपल्या व्यवसायाला डाॅक्टरी पेशाला ज्या ठिकाणी सुरुवात केली त्या सरकारी रुग्णालयाची अवस्था मात्र कधीच सुधारली नाही. याची जराही चिंता किंवा कळकळ त्यांनाही आजवर का वाटली नाही, हेच मोठे कोडे आहे. माणगांवकर या विषयी दबक्या आवाजात आपआपसात चर्चा देखील करतात. या नामांकित डाॅक्टरांची मोठी यादी होईल, या पैकी निष्णात हृदयरोगतज्ञ, प्रसुतीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, शल्यचिकित्सक सर्जन म्हणुन अनेक डाॅक्टरांची नावे लोक मोठ्या अभिमानाने सांगतात. पैकी लौकीकप्राप्त वरीष्ठ डाॅ. मदन निकम, डाॅ. बाबुराव शिंदे, डाॅ. संतोष कामेरकर, डाॅ. गौतम राऊत, डाॅ. वाझ, डाॅ. आबासाहेब पाटणकर तसेच अलिकडील डाॅ. सचिन चव्हाण, डाॅ. पटेल, डाॅ. अभिजीत माळी, डाॅ. अजय मेहता, नविन पिढीतील डाॅ. सिद्धी कामेरकर अशी अनेक नावे सांगता येतील.

या सर्वच डाॅक्टरांनी तसेच उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डाॅ. गौतम देसाई यांनीही गोरगरीब जनतेला सोयीचे आणि परवडणाऱ्या या सरकारी हाॅस्पीटलच्या अद्यावत आधुनिकीकरणासाठी माणुसकीच्या दृष्टीकोनातून एकत्रितपणे पुढाकाराने शासनदरबारी प्रयत्न करावेत अशी जनतेची मागणी आहे. सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून असे घडले तर हे रुग्णालय सुधारायला वेळ लागणार नाही. विपरित परिस्थितीत दुर्घटना घडली की प्रत्येक वेळी डाॅक्टरांनाच जबाबदार धरुन डाॅक्टर जनतेच्या रोषाचे बळी ठरतात. रुग्णसेवा हा केवळ व्यवसाय झाला आहे, अस लोक बोलतात. ही मानसिकता बदलली पाहीजे असे सर्वांना वाटते. यासाठीच सर्व डाॅक्टरांनी पुढाकार घ्यावा व प्रयत्न करावेत, कारण दिवसेंदिवस अपघाती दुखापती, साथीचे रोग, दगदग, धावपळीच्या जीवनशैलीने, वातावरणातील प्रदूषणाने जनजीवन त्रस्त झाले आहे.

गोरगरीब सर्वसामान्य जनता महागड्या शस्त्रक्रिया (ऑपरेशन), औषधोपचार, तपासण्यांमुळे रोगराईशी लढताना ईलाजापेक्षा रोग बरा, अपघाती मरण बरे अस बोलत आहे. अनेक प्रकारच्या चाचण्या तपासण्या एक्सरे, सिटीस्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी, एन्डोस्कोपी, रक्त-लघवीच्या चाचण्या, ईसीजी, टूडी इको करणे सर्व सामान्य गोरगरीबाला परवडणारे नाही. शासनाने या गोष्टीचा विचार करुन येथील वैद्यकिय सुधारणांकडे अग्रक्रमाने लक्ष द्यावे, या साठी आता सुशिक्षित डाॅक्टरांनी म्हणजेच धन्वंतरी देवाने आपले योगदान द्यावे व भविष्यात औषधोपचारा विना कोणीही वंचीत राहू नये अन्यथा रुग्णालयातील असुविधांमुळे सामाजिक शांतता बिघडण्यास वेळ लागणार नाही असे लोक बोलतात जनमानसात संतप्त भावना आहे.

Popular posts from this blog