कोकणातील शिमगोत्सव, चाकरमान्यांना लागली गावची ओढ
माणगांव (प्रतिनिधी) :-
फेब्रुवारीच्या शेवटी शनिवार पासूनच शिमगोत्सव सुरु झाला आहे. होळीचे पहिले पिलू झाले. आता सलग नऊ पिलं नऊ दिवस म्हणजेच नऊ माळा म्हणजेच रात्री नऊ नंतर छोटे-छोटे होम लावले जात आहेत. नवव्या दिवशी चोर हळकुंड व शेवटच्या दहाव्या दिवशी म्हणजे सोमवारी ९ मार्च रोजी पौर्णिमेला मोठ्या होळी भोवती प्रार्थना पूर्वक "सोन्याची पालखी नि रुप्याचं ठसं, या... या पालखीन कोन देव बसं अस म्हणत, या... या पालखीन होम देव बसं" चा गजर करीत ग्रामस्थ होळी भोवती गोलगोल फेर धरतात. हा रोमांचक अनुभव चाकरमान्यांना खुणावत आहे. आता त्यांना आपल्या गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. शिमग्याचा सण म्हणजे गावातील शेतकरी, कष्टकरी आबालवृध्दांचा सर्वात मोठा सण..! ग्रामस्थांना पर्वणीच असते.
उतेखोल येथील वाकडाई देवीच्या नयनरम्य मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देवीची सहान म्हणजे दगडी आसना जवळील होळीच्या माळावर यंदा येथील लहानथोर मंडळींची याठिकाणी छोट्या आकाराची होळी लावण्यासाठी दररोज गर्दी होत आहे. फोक वाजवीले जात आहेत. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. मोठ्या होळीच्या अदल्या दिवशी रात्री चोरहळकुंडाला उतेखोल गांव व उतेखोल वाडी येथील ग्रामस्थ मुख्य होळीच्या तयारीला लागतात. हल्ली चोर हळकुंडाला ही शक्यतो लाकूड चोरी, वृक्षतोड होत नाही. लोक स्वेच्छेन पेंडा, लाकडे देतात. होळीच्या माळावर अंदाजे १० ते १५ मिटर व्यासाची होळीची सुंदर रचना करुन मध्यभागी सावरीचे लाकूड उभे करुन लाकडे, पेंडा, गवताचा सुमारे वीस फूट उंचीचा मनोरा रचतात. गावातील महिला होळीची मनोभावे पुजा करतात होळीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखवितात.
दरवर्षी होळीला रात्री असंख्य माणगांवकर होळीचे दर्शन व होळीत नारळ टाकण्यासाठी या ठिकाणी गोळा होतात. होळीचा माळ माणसांनी फूलून जातो, तरुणांचा उत्साह पाहण्याजोगा असतो. माळावर असलेला गोल-गरगरीत आकाराचा मोठाला वजनी दगड, ओणवे होऊन उचलून खांद्यावरुन पाठीमागे टाकण्याची तरुणांमध्ये शर्यत लागते. यामधून आपल्या ताकदीचे प्रदर्शन घडविले जाते. रात्री होळी लागताच ग्रामदैवत वाकडाई देवीला पालखीत बसवून वाजत गाजत या माळावर आणली जाते. देवी येथे असलेल्या छोट्या मंदिरातील सहाणेवर मोठ्या उत्साहात विराजमान होते. तिथपासून पुढील पाच दिवस देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागते. नवसाला पावणाऱ्या या श्री वाकडाई मातेचे महत्व या दिवसात अनन्यसाधारण असते.
अशातच धुळवडीसाठी पारध करण्याचा बेत पूर्वी आखला जायचा. गावातील तरुण मंडळी मोठ्या हिम्मतीने पारधीमध्ये सामील व्हायची. परंतु अलिकडे शिकारीला बंदी असल्याने, मानवाच्या अतिक्रमणाने जंगले नष्ट झाल्याने, पारधीला जाण्याऐवजी विकतच आणून मांसाहार, तिखटाचा प्रसाद म्हणून ग्रामस्थ होळीच्या माळावर एकत्र जेवतात. याच सणात शिमग्याची सोंग काढली जातात. या सणात सर्व घराघरात आनंदाला पारावार उरत नाही. होळीच्या या विविध रंगी रुपाने आकर्षित झालेल्या ग्रामस्थ, चाकरमान्यांची पावले उत्साहाने गावाकडे का वळतात याचे नवल वाटू नये म्हणूनच म्हणतात नां "होळी रे होळी पुरणाची पोळी... होळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा." वाईट प्रवृत्ती नष्ट व्हाव्यात त्यांची होळी करण्यासाठीच या सणाचे कोकणात मोठे महात्म्य आहे.