अष्टविनायक कला अकादमी तर्फे रोजंदारी व मोलमजुरी कामगारांच्या कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
माणगांव (प्रतिनिधी) :
सध्या संपूर्ण जगासह देशात आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणु संसर्गाने थैमान घातले आहे अनेक देशांसह भारतामध्ये देखिल २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर झाले आहे. काही काऴानंतर लॉकडाऊनची मुदत वाढणार असल्याचेही संकेत मिऴत आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात रोजंदारीवर मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा याच वर्गाला जाणवणार आहे याचे भान ठेऊन व एक सामाजिक कर्तव्य म्हणुन डॉ. अजय आत्माराम मोरे यांच्या अष्टविनायक कला अकादमी या संस्थेने या गोरगरीब व हातावर पोट भरणाऱ्या समाजाला जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन आपले सामाजिक कर्तव्य निभावले आहे.
डॉ. अजय मोरे नेहमीच अनेक समाजोपयोगी कार्यक्रमात अग्रेसर असतात अश्यातच कोरोना च्या महाभयंकर संकटात समाजातील या तऴागाळातील वर्गाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालावा या भावनेतून अष्टविनायक कला अकादमीकडून माणगांव तालुक्यातील खांदाड आदिवासीवाडी व शहरातील इतर मजुरी कामगारांच्या वस्त्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन गरजूंना दैनंदीन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
अशा जिवनावश्यक वस्तूंच्या वाटपामुळे समाजातील आर्थिक बाजू उंचावलेला समाजवर्ग या गोष्टींनी प्रेरीत होऊन आर्थिक दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावेल ! असे मत डॉ. अजय मोरे यांनी व्यक्त केले, या जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या वेळी प्रत्यक्ष डॉ. अजय मोरे व त्यांचे सहकारी वैभव मोरे, योगेश सुर्वे, पुष्कर गोगटे व गणेश काटकर उपस्थित होते. या अलौकीक कार्यामुळे डॉ. अजय मोरे व अष्टविनायक कला अकादमी माणगांव यांचे तालुक्यातील सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.