माणगांव वाहतूक पोलीस विशाल येलवे व व्यापारी बाळा दळवी यांची कर्तव्यदक्षता
माणगांव (प्रतिनिधी) :
सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनेक प्रशासकीय अधिकारी व सर्वसामान्य नागरीक आपल्या कर्तव्याचे भान राखून प्रवासात अडकलेल्या नागरीकांची शक्य तेवढी मदत करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक माणगांव वाहतूक पोलीस शाखेचे हवालदार विशाल येलवे तसेच माणगांव व्यापारी असोशिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष बाळा दळवी यांच्या कर्तव्यातुन माणुसकीचे दर्शन घडले आहे. तसे म्हणायला गेेले तर विशाल येलवे हे नेहमीच आपले कर्तव्य कसोशीने पार पाडत असतात. काही महन्यापूर्वी एक युवक ट्रकखाली चिरडुन होणारा अपघात विशाल येलवे यांच्या प्रसंगावधानामुळे टळला होता. तसेच काही महीन्यांपूर्वी पेंढ्याने भरलेलाे ट्रक मुंबई-गोवा हायवेवर आग लागत होत असताना येलवे यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ही हानी टळली. तसेच माणगांव व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाळा दळवी हे देखील आपल्या कर्तव्यात कधी कसर पाडत नाहीत. माणगांवात उभी असलेली "माणुसकीची भिंत" अशा संकल्पना देखील दळवी यांच्यामुळेच पुढे आल्या आहेत.
सविस्तर वृत्त असे की, कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे कोकणातील चाकरमान्यांचा कल मुळगावी परतण्याकडे वाढला आहे. मिऴेल ती गाडी पकडुन चाकरमानी आपल्या गावाकडे परतत आहेत. काहींनी तर प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी पायी निघण्याचा मार्ग अवलंबला आहे त्यापैकी एक श्रीवर्धनच्या ग्रामीणभागातील 4/5 व्यक्ती असलेले कुटुंब वसईवरुन आपल्या मुळगावी जात असताना त्यांचा संपर्क वाहतूक पोलीस विशाल येलवे यांच्याशी झाला येलवे यांनी देखील आपल्या कामाची चुणूक दाखवत माणगांव व्यापारी असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष बाळा दळवी यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि सर्व हकीकत सांगितली. विशेष म्हणजे या कुटूंबात एक वर्षाचे लहान मुल देखील होते. दळवी यांनी या कुटुंबाला आपल्या घरी जेवण बनवुन खाऊ घातले व त्यांची गावच्या ठिकाणी सुखरुप पोहचण्याची व्यवस्था केली.
या कामावरुन माणगांव वाहतुक पोलीस व माणगांव व्यापारी असोशिएशनची माणुसकीपुर्ण कर्तव्यदक्षता दिसून आली तर वाहतूक पोलीस विशाल येलवे व व्यापारी असोसिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष बाळा दळवी यांचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.