माणगांव तालुक्यात तहसिलदार, प्रांत आणि महसूल कर्मचारी यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस प्रतिबंधक जनजागृती अभियान, नागरिकांना दिलासा!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरस या महाभयंकर संसर्गजन्य रोगाने चीन, फ्रांस, इटली, ब्रिटन आणि जगातील महासत्ता राष्ट्र असलेल्या अमेरिका या देशातील हजारो निष्पाप नागरिकांचे जीव घेऊन जगात सर्वत्र मृत्यूचे तांडव माजवले आहे. संपूर्ण जगातील मानवजातीच्या मुळावर उठलेल्या या संसर्गजन्य रोगाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जगातील आरोग्य विभाग आणि प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कंबर कसून कामाला लागली आहे. जगातील सर्व शास्त्रज्ञ या महाभयंकर विषाणूचा बिमोड करण्यासाठी प्रभावी लस तथा औषध संशोधनात दिवसरात्र व्यग्र आहेत.
कोरोना व्हायरस या विषाणूचे संक्रमण भारतात सुद्धा सर्वत्र पसरले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे भारतातील काही निष्पाप नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या संसर्गजन्य महाभयंकर विषाणूचे भारतातून समूळ उच्चाटण करण्यासाठी भारत सरकारने एकदिवसीय जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करून संपूर्ण भारतात १४ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन सुरू केले आहे. भारतातील आरोग्य विभाग आणि शासकीय व प्रशासकीय यंत्रणा सर्वार्थाने कामाला लागली आहे. कोवीड १९ ने बाधीत झालेल्या नागरिकांना ठिकठिकाणच्या विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर सर्वोतोपरी औषधोपचार सुरू आहे.
कोरोना व्हायरसचे संक्रमण पूर्ण पणे रोखण्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याच्या प्रांत माननीय प्रशाली जाधव-दिघावकर, तहसिलदार प्रियांका आयरे यांनी माणगांव तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी यांचे कोरोना व्हायरस प्रतिबंधक पार्श्वभूमीवर प्रशिक्षण घेऊन त्यांना प्रशिक्षित करून स्वतः त्यांच्या बरोबर रस्त्यावर उतरून माणगांव तालुक्यातील सर्व आरोग्य सेवक, महसूल कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, आशा वर्कर्स यांच्या टिम समवेत तालुक्यातील माणगांव, इंदापूर, गोरेगाव, खरवली, मोर्बा, साई इत्यादी विभागात प्रत्यक्ष जाऊन त्या त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संशयित होम कोरोंटाईन व सरकारी रुग्णालयातील रुग्ण आणि ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना व इतर राज्यातून, इतर जिल्ह्यातून कामाधंद्याच्या निमित्त माणगांव तालुक्यात आलेल्या व लाॅकडाऊन मुळे अडकून राहिलेल्या सर्व नागरिकांना धीर देऊन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वोतोपरी सहकार्य, मदत कार्य आणि जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्यामुळे माणगांव तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.