'कोरोना'चा प्रसार टाळण्यासाठी शिरवली ग्रामपंचायतीतर्फे नागरिकांना मोफत सॅनिट्रायझर व मास्क वाटप
खालापूर (संतोष शेवाळे) :
ग्रुप ग्रामपंचायत शिरवली, ता. खालापूर तर्फे कोरोना रोगाचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गाव, वाडी, वस्तीमधील सर्व ग्रामस्थांना मोफत सॅनिट्रायझर व मास्क चे वाटप करण्यात आले. कोरोनाचा प्रसार कसा होतो त्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली. आपले हात, पाय कसे स्वच्छ करायचे त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. तसेच रविवार, दि. २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७:००ते रात्री ९:००वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' चे आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमास ग्रुप ग्रा. पं. चे सरपंच शैलेश मोरे, ग्रामसेवक प्रल्हाद पाटील, उपसरपंच सदानंद मोरे, सर्व ग्रा. पं. सदस्य, तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते. शिरवली ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात आले. 'आमच्या गावात कोरोनाला वाव करू देणार नाही याची आम्ही सर्व दक्षता घेऊ!' असे मत ग्रामस्थांनी एकत्रितपणे मांडले. याप्रसंगी गावातील रामदास पाटील, बाळू मानकावले आणि असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.