माणगांवमध्ये कोरोना व्हायरस नाही
अफवांवर विश्वास ठेऊ नये : डॉ. आबासाहेब पाटणकर यांचे आवाहन
माणगांव (प्रतिनिधी) :- माणगांव शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सोशल मिडीया व्हॉटस् अप व फेसबूक यांसारख्या सामाजिक माध्यमांद्वारे माणगांव शहरात कोरोना व्हायरस लागण, रुग्ण आढळला आहे.! अशा प्रकारची एका महिलेच्या आवाजातील ऑडीयो क्लिप व सोबत मेसेज व्हायरल झाला आणि समस्त माणगांवकर आणि तालुक्यातील लोकांमध्ये मानसिक तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे मेसेज व्हायरल करणाऱ्या समाजकंटक व्यक्तीने चक्क माणगावातील गरीबांचे तारणहार सुविख्यात, व सुप्रसिद्ध एका डॉक्टरांनाच कोरोना व्हायरसची लागण झालेल्याचे नमुद केले होते. त्यामुळे माणगांव शहरामध्ये अधिक तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
पण पोलीस प्रशासनाने दक्षतेची भूमिका घेत माणगांव पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले यांनी सतर्कतेचे अवाहन जनतेला करत तशा अवाहनाची पोस्ट त्वरित सोशल मिडीयावर व्हायरल केली. तसेच 'माणगांव मेडीकोज'ने देखील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे अवाहन केले व माणगांव तालुक्यातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंडीयन मेडीकल असोशिएशन माणगांव शाखा अध्यक्ष डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी या सोशल मिडीयावरील पोस्टचे खंडण केले व नागरिकांना अवाहन केले की, अशा प्रकारची कोरोनासदृष्य परिस्थिती माणगांव तालुक्यात कुठेही नाही. तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे देखील नागरिकांना अवाहन केले आहे.
एकंदरीत माणगांव मध्ये निर्माण झालेले वातावरण याच दिवशी दुपारपर्यंत माणगांव पोलीस प्रशासन व डॉ. आबासाहेब पाटणकर यांनी जनतेला केलेल्या अवाहनामुळे निवळले. या सोशल मिडीयावर पोस्ट करणाऱ्याचा तपास माणगांव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्यासह त्यांची संपुर्ण टीम करीत आहे. अशा प्रकारचे विघातक कृत्य करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असे देखील पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.