लाटवण गांवचे सुपुत्र भारतीय जवान मुकेश कदम यांचे निधन
मंडणगड (प्रतिनिधी) :
मंडणगड तालुक्यातील लाटवण-पिंपळगांवचे सुपुत्र भारतीय सैन्यदलातील जवान मुकेश नारायण कदम वय (३७) यांचे झोपेत ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. गेले १६ वर्षे ते भारतीय सैन्यदलात जवान म्हणून कार्यरत होते.
मुकेश कदम यांच्या लष्करी सेवेची सुरुवात जम्मू येथे पोस्टींग ने झाली होती. ते सध्या दिल्ली मुख्यालयातील अँटलरी विभागात हवालदार या पदावर कार्यरत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण लाटवण येथील जिल्हा परीषद केंद्रशाळा व माध्यमिक शिक्षण लाटवण पंचक्रोशी हायस्कूलमध्ये झाले.
दिल्ली येथे सध्या सुरु असलेल्या दंगलीच्या बंदोबस्त कामात ते कार्यरत होते. या कामाचा ताण वाढल्याने यातूनच शनिवारी रात्री गाढ झोपेत असताना आलेल्या ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच गावासह संपुर्ण लाटवण पंचक्रोशी आणि मंडणगड तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवाचे विच्छेदन करुन त्यांना दिल्लीहून विमानाने पुण्याला आणण्यात आले व तेथून भारतीय जवानांच्या एका तुकडीसह त्यांच्या मुळगांवी लाटवण- पिंपळगांव येथे नेण्यात आले.
मंगळवार दि. ३ मार्च रोजी सकाळी त्यांचे मूळ गांव लाटवण पिंपळगांव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी एक मुलगा, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.