सायलेन्सर व हॉर्नच्या कर्कश आवाजाने रोहेकर हैराण.! 

कारवाईमध्ये रोहा पोलीस करताहेत दुजाभाव


रोेहे (समीर बामुगडे) :- 
रोहा शहरात आता नवनवीन बाईक घेण्याचे प्रमाण वाढले असून यामध्ये छंद म्हणून वेगवेगळया प्रकारच्या बुलेट गाडयांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. बुलेट ही स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरली जाते. या बुलेटला कंपनीचा असलेला सायलेन्सर बदलून दुसरा सायलेन्सर बसविण्यात येतात अशा सायलेन्सर मधून कर्कश आवाज येतो तसेच या गाडयांना हॉर्नही कर्कश बसवल्याने ध्वनी प्रदुषणात वाढ होत आहे. मात्र या आवाजाने रोहेकर हैराण झालेले आहेत. अशा गाडयांवर पोलीसांनी कारवाई करणे गरजेचे असताना याकडे कानाडोळा केला जात आहे.
रोहा शहरात बाईकस्वार व चारचाकी वाहन चालविणारे यांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. आपल्या ताब्यात असणाऱ्या वाहनांना वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न बसून त्याचा मोठा आवाज करीत शहरामध्ये फिरत असतात. सतत वाजवण्यात येणार्‍या वाहनांच्या कर्कश आवाजाने जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. काही बुलेट स्वार तर विनाकारण गाडीचे हॉर्न वाजवून पादचार्‍यांना तसेच वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, कानाचा त्रास असणारे, लहान मुले यांना नाहक त्रास देत असतात. कोणतेही कारण नसताना एखाद्याच्या जवळ जाऊन सारखा हॉर्न वाजवितात. यामध्ये धनिक, पुढारी, पत्रकार तसेच धनदांडग्यांची मुले यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या वाहनचालकांकडे रोहा पोलीसांनी मात्र कानाडोळा केला असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे जनतेमधून बोलले जात आहे.
रोहा पोलीसांनी याकडे दुर्लक्ष केल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आर.टी.ओच्या अखत्यारित टू व्हीलर, फोर व्हीलर, रिक्षा, मिनीडोर येत असून काही पोलिस अधिकारी गोरगरीब जनतेला नाहक त्रास देत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. धनिक आणि प्रतिष्ठित पुढारी यांच्या वाहनांच्या येणार्‍या कर्कश आवाजाकडे रोहा पोलीस मात्र दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना थांबवून साधी विचारपूस सुद्धा करीत नाहीत. मात्र तोच एखादा गोरगरीब असेल तर त्याला थांबवून त्याच्या गाडीची, पेपरची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई करत असतात.

Popular posts from this blog