माणगाव परिसरात संकटग्रस्त चौशिंगा हरिण प्राण्याचे दुर्मिळ दर्शन
जिल्ह्यात वन्यजीवांच्या संरक्षणाचे वन्यजीव प्रेमींचे आवाहन
माणगांव (प्रतिनिधी) :
माणगाव वन परिसरात वन्यजीव निरीक्षण करीत असताना वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांना चौशिंगा या दुर्मिळ प्रजातीच्या हरिण प्राण्याचे दर्शन झाले असून त्यांनी या प्राण्यांच्या हालचाली चित्रबद्ध केल्या आहेत. या प्राण्यांना व त्यांचा अधिवास असलेल्या परिसरांना येथे संरक्षण मिळावे असे आवाहन वन्यजीव अभ्यासकांनी केले आहे. माणगाव परिसरात शंतनू कुवेसकर यांना एक भेकर सदृश प्राणी दिसला. आपल्या जवळील कॅमेऱ्यामध्ये त्यांनी या प्राण्यांच्या हालचाली टिपून घेतल्या व अधिक निरीक्षण केले असता ही चौशिंगा जातीची पूर्ण वाढीची मादी व तिच्या सोबत एक नर जातीचे एक वर्षाचे पिल्लू असल्याचे लक्षात आले. अतिशय दुर्मिळ असलेल्या या प्राण्याचे बऱ्यापैकी अस्तित्व रायगड जिल्ह्यात दिसून येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अवैध शिकार, बेसुमार जंगलतोड, विकासाच्या नावाखाली दगड व मातीचे बेसुमार उत्खनन, नाहिशे होणारे डोंगर व पाणथळ जागा यामुळे या प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असून त्यांना व त्यांच्या अधिवासाला संरक्षण मिळण्यासाठी कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे वन्यजीव प्रेमींनी सांगितले. वनविभागामार्फत रायगड जिल्ह्यात वन्यजीवाच्या संरक्षणाचे काम चांगल्या पद्धतीने झाले आहे व होत आहे, परंतु दुर्गम भागात राहत आलेल्या लोकांमध्ये या वन्यप्राण्यांबद्दल आणि त्यांच्या अधिवासाबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे शंतनू कुवेसकर यांनी सांगितले आहे.
चौशिंगा प्राण्याबद्दल माहिती अशी की, हरणांच्या जातीचा चार शिंगे असलेला हा प्राणी गो-कुळातील टेट्रासेरस वंशाचा आहे. याचे शास्त्रीय नाव टेट्रासेरस क्वाड्रिकार्निस आहे. या वंशातील चौशिंगा हे नाव इंग्रजी भाषेत देखील रूढ झालेले आहे. गो-कुळात चार शिंगे असणारा हा एकमेव प्राणी आहे. यांचे एक असामान्य लक्षण म्हणजे नर आणि मादी या दोहोंच्याही मागच्या पायांच्या खोट्या (अधांतरी असलेल्या) खुरांच्यामध्ये गंध ग्रंथी असतात. या समूहातील इतर प्राण्यांमध्ये त्या नसतात. चौशिंगे संघचारी नसतात. ते एकएकटे वा जोडीजोडीने असतात. हा प्राणी अतिशय चपळ पण भित्रा आहे. पावसाळा हा याच्या समागमाचा काळ होय. इतर हरिण प्रजातींप्रमाणे चौशिंग्यामध्ये देखील मादीला शिंगे नसतात. चौशिंगा आणि भेकर ह्या दोन हरीण प्रजातींमधील मादीमध्ये थोडाफार फरक सोडला तर त्या अगदी सारख्याच दिसून येतात.
या दुर्मिळ वन्यजीवांची निर्दयी शिकार, बेसुमार जंगलतोड, जाणीवपूर्वक लावलेल्या वणव्यांमुळे असे वन्यजीव पुढील पिढीला फक्त गोष्टीरुपाने किंवा चित्रातूनच पाहायला मिळतील अशी सद्यस्थिती आहे. म्हणूनच जंगले वाचवा, वन्यजीवांना त्यांच्या नैसर्गिक आवासात मुक्त संचार करु द्यात, जगा आणि जगू द्या. असे शंतनू कुवेसकर (वन्यजीव अभ्यासक, माणगांव) यांनी सांगितले. तर विळा-पाटणूस येथील वन्यजीव प्रेमी राम मुंढे यांनी चौशिंगा आणि इतर दुर्मिळ प्रजातीतील प्राण्यांचा रायगडात चांगला वावर आहे. प्रयत्नपूर्वक निरीक्षण केल्यास ते दिसून येतात. मात्र यांचे अधिवास सुरक्षित होणे गरजेचे आहे. भौतिक विकास होत असताना वन्यजीवन वाचणे गरजेचे आहे असे म्हटले आहे.