मोर्बा नाक्यावर बंदरकर बिल्डींगमध्ये लागलेली भीषण आग माणगांव पोलीसांनी आटोक्यात आणली
माणगांव पोलीसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोर्बा नाका येथे बंदरकर बिल्डिंगमध्ये रूम नंबर ३०२ ला शॉर्टसर्किटने आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले आणि नाईट पेट्रोलिंग राउंडचे कर्मचारी पोलीस शिपाई /५८३ श्री. कराळे, पोलीस शिपाई / २२३८ श्री. मिसाळ, पोलीस शिपाई २२१८ गीते, ठाणे अंमलदार (पोलीस हवालदार) / १५२६ श्री. म्हात्रे, वाहन चालक पोलीस हवालदार/ १२८३ श्री. कुवेस्कर इत्यादी कार्यक्षम पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सर्वप्रथम बिल्डिंग मधील सर्व रहिवाशांना तात्काळ सुरक्षितपणे बिल्डिंग बाहेर काढले. पोलीसांना 'जनतेचे रक्षक' म्हटले जाते. कारण जनता जेव्हा-जेव्हा अडचणीत असते तेव्हा सर्वप्रथम पोलीसच धावून येत असतात. म्हणूनच महाराष्ट्र पोलीसांनी 'एक कार्यक्षम पोलीस दल' म्हणून लौकीक मिळविलेला आहे. यामुळेच माणगांव पोलीस हे कर्तव्यदक्ष असल्याचा अनुभव यावेळी येथील नागरिकांना आला.
माणगांव पोलीसांनी प्रथम हॉलमधील आग अग्निशामक यंत्राद्वारे विझवून त्यानंतर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली व नंतर समोरील बेडरूममधील आग बकेटने पाणी मारून विझविली. त्यानंतर बाजूच्या बेडरूममधील आगदेखील पाण्याचा मारा करून विझविली.
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या पोलीसांच्या ब्रीदवाक्या प्रमाणे आपल्या पोलीस खात्याची भूमिका उन, वारा, पाऊस व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आणि प्रसंगी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या माणगांव पोलीसांची कर्तव्यदक्षता व सतर्कतेमुळे मोर्बा नाका येथील बिल्डींग मधील सर्व रहिवाशी अगदी सुरक्षित असून येथे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
माणगांव पोलीसांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे बंदरकर बिल्डिंग मधील रहिवासी, तसेच मोर्बा येथील मुस्लिम समाज आणि सर्व धर्मियांसह संपूर्ण माणगांव तालुक्यातून पोलीसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.