मुठवली कालवण गावातील नागरिकांचा अनेक वर्षांपासून जीवघेण्या रस्त्यावरून प्रवास, नागरिक त्रस्त
लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त.!
बोरघर/माणगांव (विश्वास गायकवाड) : इंदापूर विभागातील मुठवली, कालवण या गावांना माणगांव तालुक्याशी जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था गेली अनेक वर्षांपासून अत्यंत बिकट झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती अथवा डांबरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून केलेले नसल्यामुळे हा रस्ता पूर्णपणे दगड धोंड्यांनी ग्रासला आहे. त्यामुळे या रस्त्याने दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना, वाहनचालकांना आणि दुचाकी वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणचे नागरिक या बिकट रस्त्यामुळे अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या खडेधोंडे युक्त उबडखाबड खाचखळग्यांच्या रस्त्यावरून दैनंदिन प्रवास केल्यामुळे येथील नागरिकांना मणक्यांच्या, मानेच्या आणि तत्सम विकारांना सामोरे जावे लागत आहे.
मुठवली, कालवण, पाणसई आणि दाखणे या गावांमध्ये आजही कोणत्याही प्रकारची खाजगी किंवा एसटी महामंडळाची एसटी बस सेवा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना आपल्या दैनंदिन कामकाजासाठी इंदापूर किंवा माणगांव येथे जाण्या येण्यासाठी खाजगी अॉटो रिक्षा भाड्याने करून जावे लागते. इंदापूर आणि माणगांव मधील रिक्षा मिनिडोर वाले या गावातील भाडे या गावातील खराब रस्त्यामुळे नाकारतात.
त्यातून सुद्धा एखाद्या रिक्षा वाल्याने या गावात जाण्याचे भाडे घेतले तर तो त्या ग्राहकाला अव्वाच्या सव्वा भाडे सांगतो. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने अवाजवी पैसे मोजावे लागतात. सार्वजनिक बांधकाम वा संबंधित विभागाने आणि लोकप्रतिनिधींनी मुठवली कालवण पाणसई दाखणे या गावातील नागरिकांच्या रस्त्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन या संबंधिची लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.