अष्टमीच्या 'त्या' घटनेविरोधात रायगड जिल्हा भाजपचा रोह्यात एल्गार मोर्चा 


    पीडित कुटुंबाच्या मागे ठामपणे उभे राहाणार                                                        

रोहे (किरण बाथम) :
रोहा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून टाकणाऱ्या अष्टमी मधील मतिमंद मुलीवरील अत्याचाराच्या घटने विरोधात आज भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष माधवी कदम यांच्या नेतृत्वाखाली रोह्यात एल्गार मोर्चा निघाला होता.                                     


अत्याचारग्रस्त मतिमंद मुलीच्या व कुटुंबाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उमटलेला हा पहिलाच दणकेबाज आवज होता. रोहे शहरातील राममारुती चौकातून शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत मोर्चाला सुरुवात केली. तत्पूर्वी प्रदेश अध्यक्ष माधवी कदम, जिल्हा महिला अध्यक्ष पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, पनवेल महानगरपालिका महापौर कविता चौथमल, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, भाजप युवा मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग, रा.जि.प. माजी विरोधीपक्ष नेते वैकुंठ पाटील, रोह्याचे माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, राजेश मापारा, प्रशांत शिंदे, सतिश लेले, राजेश पाटील, आमिर खानजादे, महेश मानकर आदि सर्वजण पीडित कुटूंबाच्या झोपडीत गेले. पीडित मुलीच्या आईचा सर्वांना पाहुन बांध फुटला.  सर्व वातावरण खुप भाऊक बनले होते. माधवी कदम यांनी तुमच्या मागे आम्ही सर्व आहोत, तुम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असे अभिवचन दिले.


रोहे शहर घोषणा देत सर्वांनी अक्षरश: दणकावुन टाकले. नारी के सन्मान मे भाजप मैदान मे, अन्याया विरोधात न्याय मिळालाच पाहिजे अशा अनेक घोषणा देत महिला खुप आक्रमक झाल्या होत्या. बाजारपेठ मधून फिरोज टॉकिज मार्गाने तहसील व पोलीस स्टेशनवर धडकलेल्या या मोर्चाला प्रांगणाबाहेर पोलिसांनी रोखले. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेस सर्वप्रथम पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी संबोधित केले. रोहा पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर व संदेहास्पद भुमीकेवर त्यांनी घणाघात केला.


अत्याचारग्रस्त मुलगी आपल्या आईसह जेव्हा पोलीस स्टेशनला आली तेव्हा संबंधीत पोलिसांनी पैशाचे आमिष दाखवून केस मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करुन या पोलिसांना त्वरित बडतर्फ करावे अशी मागणी त्यांनी केली. पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या या घटनेबाबतच्या भुमीकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनीदेखील पोलिसांनी घेतलेल्या चुकीच्या कार्यपध्दतीवर हल्ला केला. पीडित मुलगी अल्पवयीन व मतिमंद असल्याने पोलिसांनी केलेले कृत्य निंदनीय व संतापजनक असल्याचे ते म्हणाले. भाजप महिला प्रदेश अध्यक्ष माधवी कदम यांनी खूपच आक्रमक भूमिका घेऊन सभा गाजवली. महिला दिनी सुप्रिया सुळे रोहामध्ये आल्या होत्या पण त्यांनी या पीडित मुलीची दखल न घेतल्याबाबत त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले. मोर्चा नंतर हॉटेल मिराजमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.                                                   
भाजपचा हा मोर्चा विफल व्हावा म्हणून पोलिसांनी अनेकप्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले. पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत भाजप पक्ष संघटना या घटनेचा नेटाने पाठपुरावा करेल असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.

Popular posts from this blog