जीवनात कठीण प्रसंगाना सामोरे जाताना महिलांनी दृढनिश्चयी व्हावे.!
- दिवाणी न्यायाधीश डी. आर. बडवे यांचे आवाहन
- दिवाणी न्यायाधीश डी. आर. बडवे यांचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
भारत देश महासत्ता बनत असताना प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्वतःला सिद्ध करत असताना देशात स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असतील तर महिलांनी जागरूक होऊन दृढनिश्चय बनवून कायद्याच्या मदतीने संघर्ष करावा असे प्रतिपादन पारनेर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश डी. आर. बडवे यांनी केले.
श्री धर्मनाथ विद्यालय जवळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवळा गावचे उपसरपंच किसनराव सबाजी रासकर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
हुंडा व महिलांवरील अत्याचार या विषयावर बोलताना डी. आर. बडवे म्हणाले, "हुंडा व महिलांवरील अत्याचार" हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे. तो नष्ट करण्यासाठी शिक्षण हा एकमेव असा दागिना आहे ज्यामुळे महिला दृढनिश्चयी व खंबीर होऊ शकते. 'महिला दिन" हा केवळ औपचारिकता नसून तो महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या कार्यक्रमास ए. एम. पडवळे यांनी कौटुंबिक हिंसाचार, स्त्रीचा मानसिक व शारीरिक छळ यांमध्ये हे भारतीय न्यायालय तिच्या रक्षणासाठी मदत करू शकते असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी संभाजीराव सोमवंशी, गंगाधर मेहेर, सखाराम आढाव, अॅड. योगेश सालके, प्राचार्य यशवंतराव वाबळे, कोर्ट अधिकारी अभिजीत साळवे, ग्रामसेवक श्री. नरोडे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयातील विविध उपक्रमांत सहभागी असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. समीर काळे यांनी प्रस्ताविक केले, तर सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले.
आभार प्रदर्शन शाहुराव औटी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीमती भालसिंग मॅडम, मनिष कारखिले, गुरुकूल विभागप्रमुख अनिल बोरूडे यांनी विशेष परिश्रम घेतले.