माणगांव बसस्थानक अस्वच्छतेचे आगार
वाॅशबेसीनचा "थुंकीरडा" प्रवाशांचे नाक मुठीत माणगांव (महेश शेलार) :
मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या राज्य परिवहनच्या माणगांव बसस्थानकातील स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत घाणेरडी झाली आहे. प्रवास करताना या स्थानकात उतरुन प्रवासाचा शिण घालविण्यासाठी तोंडावर पाणी मारुन घेण्यासाठी किंवा लघुशंकेवरुन आल्यावर हात धुण्यासाठी येथील वाॅशबेसीनला पाणीच नाही. गुटखा खाऊन लाल पिचकाऱ्या मारुन वाॅशबेसीनचा पार उकिरडा नव्हे "थुंकीरडा" केला आहे! येथील अस्वच्छता पाहुन उलटी येईल. नाक मुठीत धरुन प्रवाशांना मुकाट्याने त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणची दैनंदिन स्वच्छता व्यवस्था पार कोलमडुन गेली आहे. माणगांव एसटी आगार की "अस्वच्छतेचे आगार?" असे प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केले जात आहे.
स्थानकाच्या मागील बाजुस मोकळ्या जागेत रान माजले आहे. प्लास्टीक पिशव्या, कचरा, घाणीचे चित्र आहे. येथे बांधण्यात आलेले दुकान गाळेही बंद पडुन आहेत. आगार व्यवस्थापणाने याकडे लक्ष वेधावे अशी प्रवाशांची मागणी आहे. रायगडचे खासदार सुनिल तटकरे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकतेच राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांना भेटून रायगड जिल्ह्यातील एसटी बसस्थानकां विषयी माहीती देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. मुंबई, गोवा, पुणे, तसेच इतर जिल्ह्यांतून विविध पर्यटन स्थळांना भेट द्यायला येथे येणाऱ्या पर्यंटकांची संख्या मोठी असते. लवकरच उन्हाळी सुट्टी सुरू होणार, पर्यंटकांचा ओघ वाढणार आहे. अशावेळी जिल्ह्यातील बऱ्याचशा एसटी बस स्थानकांची दुर्दशा झाल्याचे चित्र आहे. माणगांवची अवस्थाही फारशी बरी नाही. येथे सुशोभिकरणाची गरज आहे.
"बहुजन हिताय, बहुजन सुखाय" या राज्य परिवहनच्या ब्रीद वाक्या प्रमाणे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना पत्राद्वारे एसटी बस स्थानकांच्या तात्काळ दुरूस्तीची त्यांनी मागणी केली आहे. काही बस स्थानकांत पावसाळ्यात पाणी गळणे तर काही ठिकाणी महिलांच्या प्रसाधनगृहांची दुरावस्था आहेत. यासाठी पाली, पोलादपूर, श्रीवर्धन, माणगांव, म्हसळा, तळा, वडखळ, इंदापूर, गोरेगाव या बस स्थानकांची मुलभूत सुविधा अंतर्गत दुरूस्ती व इतर सोयी-सुविधांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देण्यासंबधीची मागणी परिवहन मंत्र्यांकडे पालकमंत्र्यानी केली असल्याचे खात्री लायकवृत्त आहे. मात्र या स्थानकात अद्याप पर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे.