शरद पवारांनी "वर्षा" वर घेतली मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट

रायगड (किरण बाथम) :
सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शनिवारी 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत सीएए, एनआरसी आणि एनपीआर या तिन्ही मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते.

सध्या सीएए आणि एनपीआर या मुद्द्यांवरून राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर शरद पवारांनी भेट घेतल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआर या तिन्ही मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्‍यता आहे.

अधिवेशनात सीएए, एनपीआर, एनआरसी या मुद्द्यांसह एल्गार परिषद, भीमाकोरेगाव असे संवेदनशील मुद्देही अधिवेशनात चर्चेला येणार आहेत. या मुद्द्यांवर भाजपाकडून महाविकास आघाडीला टार्गेट करण्यात येण्याची शक्‍यता आहे. या मुद्द्यांवर महाविकास आघाडीत कुठेही मतमतांतरे नाहीत हे दिसून आले पाहिजे. त्यामुळे या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे समजते. तसेच शेतकरी कर्जमाफी आदी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

Popular posts from this blog