तुकाराम मुंढेंचा दणका! नागपूरमधील डॉनचा बंगला केला जमीनदोस्त 

नागपूर : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी नागपूरचे आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महिन्याभराच्या आतच पहिली मोठी कारवाई केली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अजिबात थारा न देणाऱ्या मुंढेंच्या आदेशानंतर नागपूरमधील सराईत गँगस्टर असलेल्या संतोष आंबेकरच्या अलिशान बंगल्यावर हातोडा पडला आणि बंगला जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे.

इतवारी परिसरातील आंबेकरच्या या बंगल्यामधून अनेक काळे धंदे चालायचे असं बोललं जातं. त्याने अनेक गुन्ह्यांसाठी या बंगल्याचा वापर केला. मारहाण करणे, खंडणीसाठी छळ करणारे, तरुणींविरोधातील गुन्ह्यांसाठी आंबेकर याच बंगल्याचा वापर करायचा. ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी आंबेकरविरोधात कारवाईला सुरुवात केली आणि १२ ऑक्टोबरला त्याला अटक केली. त्याच्याविरोधात मारहाण, खंडणी, बलात्कार यासारखे १८ हून अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

नागपूर पोलीस आंबेकरविरोधात चौकशी सुरु केली असून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोक्का) त्याच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता आंबेकरच्या नावे असणारी अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त करण्याचे काम सुरु झाले आहे. मागील अनेक महिन्यापासून आंबेकरचा हा अलिशान बंगला पाडण्याची चर्चा शहरामध्ये सुरु होती. मात्र पालिकेमधून यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता. काही दिवसांपूर्वीच मुंढे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमधील चर्चेदरम्यान नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आयुक्तांना आंबेकर प्रकरणाची माहिती दिली. तसेच त्याचा अनधिकृत बंगला पाडण्याची कारवाई महापालिकेच्या कारभारामुळे अडकून पडल्याचेही मुंढेंना सांगितले.

मुंढे यांनी संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर तातडीने आंबेकरचा बंगला पाडण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी (२५ फेब्रुवारी) महापालिकेच्या अतिक्रम विरोधी पथकाने बंगला पाडण्यास सुरुवात केली आहे. आंबेकरच्या या बंगल्याची किंमत काही कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते. बंगल्याच्या बाहेरील भागाला सजवण्यासाठी वापरण्यात आलेला जयपुरी गुलाबी दगडाचे काम पाहूनच बंगल्याच्या किंमतीचा अंदाज बांधता येतो. तीन जेसीबी आणि एक पोकलॅण्डच्या मदतीने हा बंगला पाडण्याच्या कारवाईला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Popular posts from this blog