कधी आणि कसं कोणाशी जमवायचं ते आम्हाला चांगलं माहीत आहे - खा. सुनिल तटकरे

अशोकदादांची स्वप्ने प्रत्यक्ष साकार होत आहेत हीच खरी त्यांना श्रद्धांजली


माणगांव (महेश शेलार) :- 
राजकारणामध्ये कोणाशी कधी आणि कसं जमवून घ्यायचे ते मला आणि राजीव साबळेंना चांगलं माहीत आहे. यासाठी योगायोग येण्याची गरज असते. आमच्यात मतभेद झाले तरी माणगांवच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. अशोकदादा साबळे हे नेहमीच माणगांवच्या विकासासाठी माझ्याकडे आग्रही मागण्या करीत असत. त्या सर्व मागण्या लवकरच पूर्ण होतील. त्यांचे योगदान माणगांवसाठी फार अपूर्व असे आहे. त्यांनी माणगांवचे नाव सर्वत्र पोहचविले आहे. इतकी त्यांची मोठी राजकीय ताकद होती. ते आज हयात नसले तरी त्यांनी सांगितलेली विकासकामे पूर्ण होत आहेत. याचा मनस्वी आनंद आणि समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. असे प्रतिपादन खा. सुनिल तटकरे यांनी माणगांव येथील अशोकदादा साबळे विधी महाविद्यालयाच्या इमारत भूमिपूजन प्रसंगी शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी केले. काही वृत्तपत्रांत अॅड. राजीव साबळे आणि माझी दिलजमाई झाली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचा धागा पकडत त्यांनी वरील विधान केले. त्यामुळे काही पक्षातील लोक नाराज झाल्याने आले नाहीत. व्यासपीठावर सर्व पक्षांचे कार्यकर्ते प्रथमच एकत्र दिसले. राज्यात महाविकास आघाडी असल्याने सर्व एकत्रपणे काम करून नवे विकासपर्व सुरू होण्याची ही नांदी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेनुसार आम्ही लोकांसाठी विकासकामे करीत आहोत.

माणगांव शहरात नाट्यगृह, नाना नानी पार्क, विधी महाविद्यालय, काळ नदीवरील बंधारा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारती, जिल्हा सत्र न्यायालय अशी अशोकदादांची अनेक स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याचे काम हे मिळालेल्या  अधिकारातून होत आहेत. हीच खरी अशोकदादा साबळे यांना श्रद्धांजली आहे. स्व. अशोकदादा साबळे यांचे जरी शिक्षण कमी झाले होते तरी त्यांच्याकडे पराकोटीचे राजकीय व्यवहारज्ञान होते. त्यामुळेच माणगांव तालुक्याचा विकास घडून आला. तीन दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना विधी व न्याय खात्याचा राज्यमंत्री पदाचा पदभार मिळाला असल्याने या विधी महाविद्यालयाला या खात्यातर्फे अधिक न्याय देऊन मदत होईल. विनाअनुदानित विधी महाविद्यालय चालविणे सोपे नाही. मात्र अॅड. राजीब साबळे यांनी ही जबाबदारी घेतली असून ते उत्तमरित्या पार पाडतील असा मला विश्वास आहे. यावेळी खा. सुनिल तटकरे यांनी आपल्या खासदार निधीतून हे विधी महाविद्यालय बांधण्यासाठी २५ लाख रू. दिल्याचे पत्र दिले. याचबरोबर मी, आदिती आणि अनिकेत तटकरे माणगांवकरांच्या सदैव पाठीशी राहून माणगांवचा विकास घडवू असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माणगाव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष  केकाणे, माणगाव माजी नगराध्यक्ष आनंद यादव, माणगाव पं.स.सभापती अलका जाधव, जिल्हा वकीलबार  असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मानकर, माजी शिक्षण  सभापती ज्ञानदेव पवार, तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे, सह्याद्री पतसंस्था चेअरमन दीपक साबळे, सह्याद्री बझार अध्यक्ष संजयआण्णा साबळे, तालुका युवासेना अधिकारी कपिल गायकवाड, माणगांव व्यापारी संघटना अध्यक्ष गिरीश वडके, सेक्रेटरी कृष्णा गांधी, विधी महाविद्यालय स्थानिक कमिटी चेअरमन अॅड. विनोद घायाळ, संस्थेचे पदाधिकारी राजन मेथा, सुभाष मेथा, नितीन बामगुडे, नरेंद्र गायकवाड, ज्योती बुटाला, महाविद्यालय विकास समिती वैभव साबळे,  सुधाकर शिपूरकर, मजिद हाजिते, पंकज खामगावकर, निलेश मेथा, रमेश वेदपाठक, प्राचार्य डॉ. खामकर, अॅड. शमा फारुकी यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य, शिक्षकांवर्ग व शिक्षेत्तर कर्मचारी वर्ग, पालक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

Popular posts from this blog