आदर्श प्राथमिक विद्यामंदीर माणगांव शाऴेत शिवजयंती निमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शन
माणगांव : (राजेश जाधव) :
माणगांव शहरातील कांचनगंगा शिक्षण संस्था संचालित, आदर्श प्राथमिक विद्यामंदीर या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाऴेकडुन शिवजयंती सोहऴा एक आगऴ्या वेगऴ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला गेला. सोहऴ्याची सुरुवात प्रभातफेरीने करण्यात आली. या प्रभातफेरीचे खास आकर्षण होते ते म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी केलेली छत्रपती शिवराय, माँ जिजाऊ, मावऴे यांची वेषभुषा. यानंतर शालेय प्रांगणात लावलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शानाचे उद्घाटन माणगांमधील जेष्ठ उद्योगपती अशोक धारीया व संस्थेचे संस्थापक एल. एस. जंगम (सर) यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन झाले.
शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी महेश मोरे (कोकण कडा मित्र मंडऴ) व सतिश कळंबे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे संस्थापकांनी मनोगतात सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन शिवरायांचे चरित्र मांडले,तसेच इयत्ता पाचवीमधील कु. जय संतोष खाडे व इयत्ता चौथीमधील कु. सावली मुंढे यांनी आपल्या खड्या आवाजात शिवरायांच्या पोवाड्याचे गायन केले,तसेच आजच्या कार्यक्रमातील प्रमुख बाल-वक्ती कुमारी सिद्धी घाडगे हिने आपल्या अमोघ वाणीतुन शिवजन्मापुर्वीचा महाराष्ट्र व शिवरायांचे चरित्र बालवक्तृत्वातुन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले.
या मराठी माध्यमाच्या शाऴेकडुन घेण्यात आलेल्या या आगऴ्या-वेगऴ्या उपक्रमामुऴे माणगांव तालुका तसेच जिल्ह्यातून अनेक शिवप्रेमींनी या प्रदर्शन सोहऴ्याची भेट घेतली. याठिकाणी शिवकालीन शस्त्रांमध्ये त्याकाऴी वापरण्यात येणारे तोफगोऴे, तलवारी, ढाली, भुईसुरुंग, महाराजांचे राजदंड, मोरचेल, चवरी, कट्यार, भाले, दांडपट्टा, फरशी या वस्तु हातऴण्यास मिऴाल्यामुऴे विद्यार्थ्यांमध्ये शिवकालीन इतिहासाची जाणीव जागृत झाली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सविता निंबाऴकर यांनी केले तर, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अमोल जंगम (सर) व सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.