कोरोना सर्च करताय तर सावधान
मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांचा या धोकादायक व्हायरसने बळी घेतला आहे. आतापर्यंत फक्त कोरोना व्हायरसपासून सावधान राहा असं सांगण्यात येत होतं. पण आता कोरोना हॅकर्सपासून सावध राहा असं सांगण्यात येत आहे. कारण हा कोरोना हॅकर थेट तुमचा अकाऊण्ट रिकामा करु शकतो. कोरोनाच्या नावावर आता हॅकिंग सुरू झालं आहे.
तुम्हाला एखाद्या अननोन नंबरवरून किंवा अननोन वेबसाईटवरुन कोरोना व्हायरसची लिंक आली, तर ती पटकन ओपन करु नका. कारण हा हॅकर असू शकतो. जपान आणि युरोपनंतर हा प्रकार आता भारतात सुरू झाला. कोरोनावरच्या लिंकवर क्लिक करताच तुमचा अकाऊंटच रिकामा होऊ शकतो.
महाराष्ट्रात या कोरोनाच्या नावावर फसवणूकीच्या तक्रारी आल्यायत. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय. कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातलाय, त्यामुळे बरेच लोक कोरोनाची लिंक आली की ती लगेच ओपन करतात. त्यामुळे हे नव्या प्रकारचं कोरोना सायबर फिशिंग सुरू झालंय.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस या व्हायरसमुळे मृतांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. संपूर्ण देशभरात १७ हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती आहे. यामुळे भारत सरकारने खबरदारी म्हणून चीनी पासपोर्ट धारकांचा ई-व्हिसा रद्द केला. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.