डोनाल्ड ट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात
अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली आणि अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. जयपूरच्या अरुण पाबुवाल यांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी तयार केली आहे. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला दिल्ली प्रवासादरम्यान याच सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या थाळीत जेवण वाढले जाईल.
डिझाइन केलेल्या या खास गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये ट्रम्प आणि त्यांचे कुटुंब ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करणार आहे अशी माहिती पाबुवाल यांनी दिली. या क्रॉकरीमध्ये कपसेटपासून ड्रायफ्रूट ठेवण्याची कटलरी सुद्धा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला खास नॅपकिन सेटही बनवण्यात आला आहे. त्यावर ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
३५ जणांच्या टीमने तीन आठवडयांमध्ये सोन्या-चांदीची ही क्रॉकरी बनवली आहे. वेगवेगळया धातूंचा समावेश केलेल्या या थाळयांना सोन्या-चांदीचा मुलामा देण्यात आला आहे.
बराक ओबामा यांच्यासाठी सुद्धा केलं होतं डिझाइन
कुठल्या व्हीआयपीसाठी पाबुवाल यांनी पहिल्यांदा अशी खास क्रॉकरी डिझाइन केलेली नाही. यापूर्वी भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी त्यांनी अशा प्लेट्स बनवल्या आहेत. क्रिकेट वर्ल्ड कप पासून ब्युटी कॉन्टेस्ट स्पर्धेसाठी मुकूटही बनवण्याचा अनुभवही त्यांच्याकडे आहे.

Comments
Post a Comment