मुलगी झाली म्हणून पत्नीला घरात घेण्यास पतीचा नकार, 10 दिवसांपासून आई आणि चिमुरडी रुग्णालयात 

ठाणे : पत्नीला दुसऱ्यांदा मुलगी झाली म्हणून पतीने आपल्या पत्नीला आणि 20 दिवसाच्या चिमुकलीला घरात घेण्यास नकार दिला. हा धक्कादायक प्रकार अंबरनाथ तालुक्यात समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित महिला मनीषा चिडा गेल्या 10 दिवसांपासून आपल्या मुलीसोबत रुग्णालयात आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाला असतानाही पती आणि सासरचे कोणीच तिला घ्यायला आले नाही. अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली या भागातील आदिवासी पाड्यामध्ये ही महिला राहते.

मनिषाला 5 फेब्रुवारीला दुसरी मुलगी झाली होती. घरातच बाळांतपण झाल्यानंतर चिमुकलीला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे मनीषाने आपल्या चिमुकलीला घेऊन मंगरुळ भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. मात्र बाळाची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान गेल्या 10 दिवस मनीषा मद्यवर्ती रुग्णालयात दाखल असून सुद्धा पती रुग्णालयात आला नाही. विशेष म्हणजे पतीने बाळाची आणि मनिषाची साधी विचारपूस देखील केली नाही.

“मुलगी नको आहे, असे पतीने सांगितल्याने तो मला रुग्णालयातून घरी घेऊन जायला तयार नाही. 10 दिवसात फक्त एकदा सासू रुग्णालयात आली होती. मात्र मुलीला न बघता ती निघून गेली”, असे मनीषाने सांगितले.

Popular posts from this blog