श्री. ग्रामदैवत जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज नवरात्र उत्सव
नागोठणे शहराची जागृत ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता
नऊ दिवस भक्तीचा महापूर
नागोठणे, दि. १२ (महेंद्र माने) :- नागोठणे हे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील देवभूमी असलेले ऐतिहासिक शहर. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुरातन असलेले सी.के.पी. समाजाचे रामेश्वर मंदिर, मारुती मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, ब्राम्हण समाजाचे नवीन रामेश्वर मंदिर, दत्त मंदिर, मरीआई मंदिर,ज्ञानेश्वर मंदीरांबरोबरच शहराची ग्रामदैवत जोगेश्वरी माता ही तीन तळ्यांच्या मध्यभागी भव्य मंदिरात वास्तव्य करीत आहे. मंदिरामध्ये जोगेश्वरी मातेसह भैरवनाथ महाराज व वाघ्रेश्वर महाराजांची स्थापना करण्यात आली आहे. सालाबाद्प्रमाणे यावर्षीही रविवार 11 ऑक्टोबर ते बुधवार 19 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. नवरात्री निमित्ताने संपूर्ण मंदिर, प्रांगणात व तीन तळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
फार वर्षापूर्वी नागोठणे गावाच्या हद्दीतील मुरावाडी येथील हिरू ताडकर हे नियमितपणे आपली गुरे चरण्यासाठी नागोठणे गावाच्या पूर्वेकडील डोंगरपठारावर गेले असता, कोणीतरी हाक मारीत असल्याचा भास झाला. दुसर्या दिवशीही त्याच ठिकाणी पुन्हा तसाच भास झाला. त्यांनी इकडे-तिकडे पहिले त्यांना कोणीही दिसले नाही. आवाज कुणाचा असेल याचा विचार करीत ते सायंकाळी घरी आले. रात्री झोपले असताना त्यांना देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि सांगितले की, तू ज्या ठिकाणी गुरे चरायला जातोस त्या ठिकाणी मी आहे. मला तुझ्या गावी घेऊन चल. मी ज्या ठिकाणी जड लागेन त्या ठिकाणी मला उभ्याने टाकून दे. दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे ताडकर गुरे चरायला डोंगरपठारावर गेले असताना देवीने दिलेला दृष्टांत आठवला व तिने सांगितलेल्या ठिकाणी गेल्यावर तिथे देवीची पाषाणरूपी मूर्ती दिसली. मूर्ती पाहून त्यांना खूप आनंद झाला. मोठ्या श्रद्धेने त्यांनी ती मूर्ती डोक्यावर घेतली व आपल्या गावी चालत निघाले. वाटेत ते नागोठणे येथील तीन तळ्यांच्या मध्यभागी आल्यावर त्यांना मूर्ती जड वाटू लागली. त्यांनी विचार केला की, जर मूर्ती उभ्याने टाकली तर मूर्तीची तोडफोड होईल म्हणून त्यांनी मूर्ती हळूच खाली ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु मूर्तीचा भार ताडकर यांना सहन न झाल्याने मूर्ती खाली ठेवतानाच त्यांना मूर्तीचरणी मोक्षप्राप्ती झाली. त्याच ठिकाणी मूर्तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पोवळे कुटुंबियांच्या अंगात भैरीचे वारे आले आणि त्यांनी जोगेश्वरी ही माझी बहीण असून त्या शेजारी माझी प्रतिष्ठापना करा असे सांगितले त्यानंतर रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील भैरीच्या देवस्थानातून भैरवनाथ महाराजाचे तत्व आणून देवीच्या शेजारी भैरवनाथांची व वाघ्रेश्वर महाराजांची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हा पासून नागोठणे येथील तीन तळ्यांच्या मध्यभागी वास्तव्य करीत असलेले जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज या नावाने हे मंदिर प्रसिद्ध झाले. जागृत असलेल्या या मंदिरामध्ये देवीच्या पालखी उत्सवासह नवरात्रही मोठ्या उत्साहात धार्मिकतेने साजरा करण्यात येतो. सालाबाद्प्रमाणे यावर्षीही रविवार 11 ऑक्टोबर ते बुधवार 19 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. नवरात्रीनिमित्ताने संपूर्ण मंदिर, प्रांगणात व तीन तळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येऊन मातेच्या मंदिरात रविवार 10 ऑक्टोबर रोजी सायं.03.00 वाजता घटस्थापनेनंतर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नरेंद्र जैन, सचिव भाई टके, उत्सव कमिटी अध्यक्ष चंद्रकांत ताडकर,माजी अध्यक्ष विलास चौलकर यांच्यासह कमिटी पदाधिकारी सदस्य व नागोठणेकर ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीचे वतनदार व मानकरी राजेश पोवळे यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. तसेच सोमवार - सायं.03.00 ते 05.00 वा. श्री मरिआई भजन मंडळ आटीवली, गायक विजय सिताराम पाटील यांचे भजन, मंगळवार - सायं. 03.00 ते 05.00 वा. ओम साई महिला मंडळ रोहा यांचे भजन,बुधवार - सायं.03.00 ते 05.00 वा. कुलस्वामिनी प्रसादिक भजन कासू (अरुण पाटील) सौजन्य-वै.सौ. शांतीबाई व कै. नारायण देवजी शेळके यांच्या स्मरणार्थ डॉ. शेळके परिवार, शुक्रवार सायं. 03.00 ते 05.00 वा. सखी भजनी मंडळ रोहा यांचे भजन ग्रामस्थ महिला नागोठणे भोंडला व हळदीकुंकु,शनिवार - सायं. 03.00 ते 05.00 वा. दुर्गा सप्तशती पाठ,रविवार सायं. 03.00 ते 05.00 वा. शिवशंभो भजन मंडळ नागोठणे यांचे भजन, सोमवार सायं. 03.00 ते 05.00 वा. जय भवानी नाच मंडळ वाशी - बोरघर, मंगळवार 20 ऑक्टोबर रोजी दसऱ्यानिमित्त सकाळी 10 ते 11 वा. बासरी वादन कु. मेघ निलेश पोटे, तबला साथकरी - पुष्कर महाजन आणि सर्वेश गुरव यांची साथ मिळणार आहे. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये दररोज जोगेश्वरी माता, भैरवनाथ व वाघ्रेश्वर महाराज यांना नवनवीन पारंपारिक वस्त्रे व दागदागिने परिधान केले जातात. त्याचप्रमाणे भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळी हरिपाठ, महाआरती तसेच वेगवेगळ्या आळींचा गरबा नृत्य झाल्यानंतर रात्री 09.30 ते 11.30 वा. पेण येथील कीर्तनकार ह.भ.प. अथर्व घाटे यांचे किर्तन तसेच जागरचा कार्यक्रम साजरा करण्यात येतो. नऊ दिवस खडकआळी, प्रभूआळी, आंगर आळी, कुंभार आळी, मराठाआळी, गवळ आळी, कोळीवाडा, रामनगर यांचा जागता पहारा असतो. तसेच नऊ दिवस चालणार्या या धार्मिक कार्यक्रमात शहरातील व परिसरातील भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या दिवसात बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागोठणेकर, माहेरवासींणी देवीची ओटी भरण्यासाठी तसेच विभागातील भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ नागोठणे शहर व विभागातील भाविकांनी घेण्याची विनंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य यांनी केली आहे.

Comments
Post a Comment