रोह्याचे जागृत ग्रामदैवत श्री धावीर महाराज
श्रद्धा, परंपरा आणि लोकसहभागाचा १७८ वर्षांचा गौरवशाली वारसा!
कोणत्याही व्यक्तीच्या नावापेक्षा देवाचे नाव मोठे मानणारी परंपरा
भक्ताच्या ओढीपोटी रोहा नगरीत आगमन; ब्रिटिशकालीन सशस्त्र पोलीस मानवंदनेची अनोखी परंपरा आजही अखंड सुरू!
॥ श्री धावीर महाराज की जय! ॥
रोहा-रायगड, दि. १२ (संदीप सरफळे) :- श्रद्धा ही केवळ उपासनेपुरती मर्यादित नसते, तर ती संकटात आधार देणारी, मनाला उभारी देणारी आणि जीवनाला नवी दिशा देणारी शक्ती असते. रोहा नगरीचे जागृत ग्रामदैवत श्री धावीर महाराज हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे असेच अधिष्ठान आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, दुःखितांना धीर देणारे आणि संकटसमयी पाठीशी उभे राहणारे श्री धावीर महाराज म्हणजे रोहेकरांचे लाडके दैवत, त्यांचे आराध्य आणि त्यांच्या अस्मितेचा अविभाज्य भाग!
भक्ताच्या निष्ठेपोटी रोहा नगरीत आगमन
श्री धावीर महाराजांचे मूळ स्थान रोह्यापासून सुमारे आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वनराईत वसलेल्या वराठी गावात आहे. तेथील स्वयंभू मूर्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोह्याचे तत्कालीन सुभेदार बळवंत विठोजी मोरे हे महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण न करण्याचा त्यांचा नेम होता. त्यामुळे ते दररोज घोड्यावरून मोरे आळी ते वराठी असा प्रवास करीत असत.
काळाच्या ओघात वाढत्या वयामुळे हा प्रवास कठीण होऊ लागला. मात्र, दर्शनाविना अन्नग्रहण न करण्याचा त्यांचा नियम कायम होता. आपल्या भक्ताची ही तळमळ पाहून महाराजांनी त्यांना स्वप्नदृष्टांत दिला. रोह्याच्या पश्चिमेला असलेल्या उंच कातळावरून वराठीच्या डोंगराला नमस्कार केला, तरी तो आपल्यापर्यंत पोहोचेल, असा दृष्टांत महाराजांनी दिल्याची आख्यायिका सांगितली जाते.
त्यानंतर रोह्याचे वतनदार बापूजी राजे देशमुख यांच्या सहकार्याने त्यांच्या मालकीच्या कातळावरील जागेत श्री धावीर महाराजांचे मंदिर उभारण्यात आले. माघ शुद्ध त्रयोदशी, शके १७६९ अर्थात सन १८४८ मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. फाल्गुन वद्य अष्टमी, शके १७७० अर्थात सन १८४९ मध्ये सध्याच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अशा प्रकारे भक्ताच्या निष्ठेला प्रतिसाद देत श्री धावीर महाराज रोहा नगरीत विराजमान झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ग्रामदैवत म्हणून मान्यता; नवरात्रोत्सवाची परंपरा
सन १८६० मध्ये झालेल्या रोहेकरांच्या ग्रामसभेत श्री धाकसूद महाराजांसोबतच त्यांचे कनिष्ठ बंधू श्री धावीर महाराज यांनाही ग्रामदैवत म्हणून स्वीकारण्यात आले. त्यांच्यासोबत खाजणीच्या श्री काळकाई देवीचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. सन १८६२ पासून मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. आजही हा उत्सव रोहेकरांच्या अपार श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो.
सन १९१६ मध्ये रोहेकरांच्या लोकवर्गणीतून मंदिराचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. सुमारे अडीच वर्षे चाललेल्या या कामात मंदिर आणि सभामंडप सागवानी लाकडात साकारण्यात आले. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी श्री धावीर महाराज, उजव्या बाजूस श्री बहिरोबा महाराज व पुढे उत्तराभिमुख श्री वाघ बाप्पा, तर डाव्या बाजूस श्री काळकाई देवी आणि पाठीमागे तीन गवळी वीर विराजमान आहेत. मंदिराबाहेर श्री चेडा महाराज आणि नंदी महाराज यांची स्थाने आहेत.
नवरात्रोत्सव : भक्ती, जागरण आणि लोकपरंपरेचा संगम
श्री धावीर महाराजांचा नवरात्रोत्सव म्हणजे रोहेकरांसाठी केवळ धार्मिक सोहळा नव्हे, तर श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक एकोप्याचा उत्सव आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ होतो. नवरात्रात सकाळी, सायंकाळी सात वाजता आणि मध्यरात्री बारा वाजता महाराजांची महाआरती केली जाते. गोंधळी बांधवांच्या कीर्तनाने आणि गोंधळाने मंदिर परिसर भक्तिमय होतो. त्यानंतर शहरातील विविध भागांना परंपरेनुसार नेमून दिलेल्या प्रहरांमध्ये भाविकांना रात्रभर महाराजांच्या सानिध्यात जागरण करण्याची संधी मिळते.
सप्तमीला महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला जातो, तर स्थानिक भजनी मंडळे दररोज आपली भक्तिसेवा महाराजांच्या चरणी अर्पण करतात. अशा या उत्सवातून पिढ्यान्पिढ्या चालत आलेली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही जपली जात आहे.
पालखी सोहळा आणि सशस्त्र पोलीस मानवंदना : रोह्याची अनोखी ओळख
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी श्री धावीर महाराजांची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. सुमारे २६ ते २८ तास चालणाऱ्या या सोहळ्यात महाराज भक्तांच्या भेटीसाठी संपूर्ण नगरीत भ्रमण करतात. पालखीच्या आगमनाने परिसरात चैतन्य संचारते, भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात आणि संपूर्ण रोहा भक्तिरसात न्हाऊन निघतो.
या पालखी सोहळ्याचे सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे पालखी प्रस्थानापूर्वी आणि नगरप्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरात परतल्यानंतर २१ जवानांच्या सन्मान गार्डस् आणि १० सदस्यांच्या पोलीस बॅण्ड पथकाने दिलेली मानवंदना! ब्रिटिशकालापासून चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे.
लोकपरंपरेनुसार, ब्रिटिश काळात बापूजी देशमुख यांच्यासोबत गस्तीवर असलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्यावर मुरूडच्या सिद्दीच्या सैनिकांकडून हल्ला होण्याचा प्रसंग ओढवला. त्यावेळी देशमुखांनी श्री धावीर महाराजांचा धावा केला. अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याचा आवाज घोड्यांच्या टापांसारखा भासल्याने हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. महाराजांनीच आपले रक्षण केल्याची भावना त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मनात निर्माण झाली आणि त्याने महाराजांना मानवंदना दिली, अशी आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजही श्रद्धा आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देत आहे.
लोकवर्गणीतून उभी राहिलेली भव्य वास्तू; प्रसिद्धीपेक्षा श्रद्धेला महत्त्व!
काळाच्या ओघात मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार रोह्याचे सुपुत्र आणि स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांच्या शुभहस्ते सोमवार, १४ मार्च १९९४ रोजी संपन्न झाला. या वेळी रोह्यातील विविध भागांतून कलशपूजन करून भव्य मिरवणुकीने कलश मंदिरात आणण्यात आले. त्या कलशांतील पवित्र जल मंदिराच्या पायाभरणीत अर्पण करण्यात आले.
आज श्री धावीर महाराजांच्या मंदिराची भव्य वास्तू आणि सुंदर परिसर पाहताना रोहेकरांच्या सामूहिक श्रद्धेची ताकद प्रकर्षाने जाणवते. या मंदिराच्या उभारणीमागे लोकवर्गणी, लोकसहभाग आणि असंख्य भक्तांचे योगदान आहे. मात्र, या मंदिरावर एखाद्या देणगीदाराचे नाव कोरलेले दिसत नाही. प्रसिद्धीच्या झगमगाटात स्वतःचे नाव मोठे करण्याची स्पर्धा सुरू असलेल्या आजच्या काळात, कोणत्याही व्यक्तीच्या नावापेक्षा देवाचे नाव मोठे मानणारी ही परंपरा खऱ्या अर्थाने अनुकरणीय आहे.
श्री धावीर महाराजांचे मंदिर म्हणजे केवळ दगड-विटांची वास्तू नाही; ती रोहेकरांच्या श्रद्धेचे प्रतीक, इतिहासाचा ठेवा, सांस्कृतिक परंपरेचा वारसा आणि सामाजिक एकात्मतेचे केंद्र आहे. अनेक पिढ्यांनी जपलेली ही भक्ती आजही तितक्याच सामर्थ्याने पुढे जात आहे.
रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज म्हणजे रोहेकरांच्या श्रद्धेचा श्वास, संकटातील आधार आणि नगरीच्या अस्मितेचा मानबिंदू!

Comments
Post a Comment