आदिवासी समाजातील पहिली वकील ॲड. सपना वाघमारे हिच्या उच्च शिक्षणासाठी पालकमंत्री भरतशेठ गोगावले दांपत्याचा मदतीचा हात
५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करत केला गुणगौरव
महाडमध्ये कौतुक सोहळा संपन्न
महाड-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- गरीबीची झळ आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची कास धरणाऱ्या खेडोपाड्यातील गुणवंत विद्यार्थिनी आज आपल्या कर्तृत्वाने यशाची नवनवीन शिखरे पार करत आहेत. अशाच एका खडतर संघर्षातून पुढे येत आदिवासी कातकरी समाजातील वाडीवर राहणाऱ्या ॲड. सपना वाघमारे या तरुणीने पुण्यामध्ये वकिलीची पदवी यशस्वीरीत्या पूर्ण केली असून आता ती वकिलीतील पदव्युत्तर म्हणजेच 'एलएलएम' (LL.M.) चे उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. समाजातील पहिली वकील ठरलेली सपना सातासमुद्रापार लंडन येथे शिक्षणासाठी जात असल्याची आनंदाची वार्ता समजताच, गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवत पुढील शिक्षणासाठी ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करून तिचा यथोचित गुणगौरव केला.
महाड येथे पालकमंत्री दहीहंडी उत्सव कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी पालकमंत्री भरतशेठ गोगावले दांपत्याच्या हस्ते ॲड. सपना वाघमारे व तिचे मामा श्री. भिवा बळीराम पवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुलींच्या उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात, ज्याचा लाभ घेत सपनाला शासनाकडून लंडन येथे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. मात्र परदेश प्रवासाचा आणि इतर शैक्षणिक खर्च लक्षात घेऊन ना. गोगावले यांनी तत्परतेने ही आर्थिक मदत तिच्या स्वाधीन केली. याप्रसंगी बोलताना ना. भरतशेठ गोगावले यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी समाजातील कन्या प्रतिकूलतेवर मात करून वकील होते आणि आता उच्च शिक्षणासाठी लंडनला जाते, ही अवघ्या रायगडकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आपले उच्च शिक्षण लंडन येथेच पूर्ण केले होते, याची आठवण करून देत सपनाने तेथून उच्च विद्याविभूषित होऊन परत आल्यानंतर वंचित, उपेक्षित व आदिवासी घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्र्यांच्या या मदतीमुळे आणि आपुलकीच्या शब्दामुळे भारावून गेलेल्या सपना वाघमारे हिने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आयुष्यातील अनेक दुःखे, संकटे आणि गरिबीशी संघर्ष करत तिने हे शिक्षण पूर्ण केले आहे. या संपूर्ण प्रवासात तिचे मामा भिवा पवार, मामी सौ. ज्योत्स्ना पवार, तिचे आजोबा आणि संपूर्ण कुटुंबीय खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळेच ती इथपर्यंत पोहोचू शकली. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे तिचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून लंडनमधून एलएलएम पूर्ण करून आल्यानंतर ती नक्कीच समाजाच्या परिवर्तनासाठी आणि प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करेल, असा विश्वास तिने दिला. याच वेळी तिचे मामा श्री. भिवा पवार हे देखील भावूक झाले. सत्ता, पैसा आणि संपत्ती समाजात अनेकांकडे असते, परंतु त्या संपत्तीचा उपयोग गरीब आणि वंचित घटकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जो करतो, तोच खरा दानशूर असतो; ना. गोगावले यांनी हे सिद्ध करून दाखवले असून ते खऱ्या अर्थाने जनतेचे पालक आहेत, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सपना वाघमारे हिच्या या दैदिप्यमान यशामागे आणि ही महत्त्वपूर्ण भेट घडवून आणण्यामागे अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले. श्री. भिवा पवार कार्यरत असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळाचे सरचिटणीस डॉ. निलेशजी रेवगडे यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून रातवड हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. संतोष कदम सर, त्यांचे विद्यार्थी श्री. महाडिक, कोलाडचे ज्येष्ठ शिवसैनिक तथा रोहा उपतालुकाप्रमुख श्री. चंद्रकांत लोखंडे तसेच पत्रकार श्री. सुरेश शिंदे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. समाजातील एका जिद्दी कन्येच्या पंखांना बळ देणाऱ्या या कौतुक सोहळ्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत असून पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या संवेदनशील दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment