ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

'तारक मेहता का उल्टा चश्मा' लाइव्ह क्विझमध्ये अलिबागच्या कदम कुटुंबाने मारली बाजी!

प्रसिद्ध गोकुळधाम सोसायटी सेटला देणार भेट

 लाखो प्रेक्षकांमधून निवड 

​अलिबाग-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि कौटुंबिक मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष लाइव्ह क्विझ स्पर्धेत अलिबाग येथील मीरा समीर कदम आणि त्यांच्या कुटुंबाने घवघवीत यश मिळवत विजेतेपद पटकावले आहे. या यशाबद्दल कदम कुटुंबावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांना मालिकेच्या प्रत्यक्ष सेटला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

​सोनी सब आणि नीला फिल्म प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते २१ ऑगस्ट या कालावधीत १८ दिवसांच्या भव्य लाइव्ह क्विझचे आयोजन करण्यात आले होते. 'टीएमकेओसी क्लब हाऊस' (TMKOC Club House) ॲपच्या माध्यमातून घेतलेल्या या स्पर्धेत देशभरातील लाखो चाहत्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता. या अनोख्या क्विझ स्पर्धेद्वारे प्रेक्षकांना गोकुळधाम सोसायटी, मालिकेतील रंजक प्रसंग आणि आपल्या लाडक्या कलाकारांविषयीचे ज्ञान तपासण्याची उत्तम संधी मिळाली होती. संपूर्ण देशभरातून या उपक्रमाला प्रेक्षकांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला असून, विजेत्यांची नावे टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहेत.

​या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अलिबागच्या मीरा कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चमकदार कामगिरी करत विजेत्यांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. या विजयामुळे कदम कुटुंबाला मुंबईतील गोकुळधाम सोसायटीच्या प्रसिद्ध सेटला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी प्राप्त झाली आहे. तसेच मालिकेच्या चित्रीकरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि लाडक्या कलाकारांसोबत मालिकेचा १८ वा वर्धापन दिन प्रत्यक्ष साजरा करण्याचे भाग्य त्यांना लाभणार आहे.

​या भव्य उपक्रमाला देशभरातील प्रेक्षकांकडून मिळालेल्या अफाट प्रतिसादाबद्दल मालिकेचे निर्माते आणि क्रिएटर असित कुमार मोदी यांनी मनापासून आनंद व्यक्त केला आहे. प्रेक्षकांचे हे अथांग प्रेम पाहून सुरुवातीच्या नियोजनापेक्षा अधिक, म्हणजेच १८ हून अधिक भाग्यवान कुटुंबांना गोकुळधाम सोसायटीच्या सेटवर आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोनी सबचे चीफ कंटेंट ऑफिसर अजय भालवणकर यांनीही या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आणि प्रेक्षकांच्या अतूट विश्वासाबद्दल समाधान व्यक्त करत विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. अलिबागच्या कदम कुटुंबाला मिळालेल्या या बहुमानामुळे स्थानिक परिसरात तसेच कोकणातील तमाम प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog