ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

पावसाच्या हजेरीत रोह्यात गोविंदांचा जल्लोष!

शिस्तबद्ध मानवी मनोऱ्यांनी दहीहंड्या फोडत परंपरेचा सोहळा उत्साहात संपन्न

 जलधारांमध्ये बालगोपाळांची धूम 

​रोहा-रायगड, दि. ६ (प्रतिनिधी) :- गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी दुपारी रोहा शहरात जोरदार हजेरी लावताच अवघ्या वातावरणात चैतन्य संचारले आणि गोविंदांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले. कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, ढोल-ताशांचा गगनभेदी गजर आणि 'गोविंदा रे गोपाळा'च्या जयघोषाने अवघी रोहा नगरी दुमदुमून गेली होती. निसर्गाची साथ आणि तरुणाईचा अथांग उत्साह यांच्या मिलाफातून रोह्यात पारंपरिक गोकुळाष्टमीचा उत्सव अत्यंत दिमाखात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. दुपारनंतर शहरातील विविध आळ्यांमधून पारंपरिक वेशभूषेत सजलेली गोविंदा पथके रोहा बाजारपेठेकडे दाखल होऊ लागली, आणि पाहता पाहता मुख्य बाजारपेठेला जत्रेचे भव्य स्वरूप प्राप्त झाले.

​तालुक्यात यंदा जवळपास १२४ लहान-मोठ्या दहीहंड्यांचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. या सर्व आयोजनात बाजारपेठेतील समीर शेडगे यांनी उभारलेली भव्य दहीहंडी सर्वांचे विशेष आकर्षण ठरली. उंचच उंच लटकवलेल्या या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी एकमेकांच्या खांद्यावर पाय ठेवून थर रचण्यास सुरुवात केली. मानवी मनोऱ्यांची थरारक कसरत आणि गोविंदांचे अफाट कौशल्य पाहण्यासाठी रोहा तसेच अष्टमी परिसरातील अबालवृद्धांनी बाजारपेठेत अलोट गर्दी केली होती. प्रत्येक थरावर चढणाऱ्या बालगोपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला, ज्यामुळे वातावरणातील रोमांच उत्तरोत्तर वाढत गेला.

​या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक गोविंदा पथकांनी जपलेली शिस्त आणि परस्पर ताळमेळ. मोरे आळी, अंधार आळी आणि 'रोह्याचा राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनगर आळीच्या गोविंदा पथकांनी परंपरेचे काटेकोर पालन करत एकामागून एक दहीहंड्या शिस्तबद्ध पद्धतीने फोडल्या. यासोबतच गोरोबा नगर-दमखाडी येथील शिस्तबद्ध गोविंदा पथक आणि महात्मा फुले नगर येथील संत रोहिदास गोविंदा पथकाने मुख्य हमरस्त्यावरून आगेकूच करत तीनबत्ती नाका पोलीस चौकीपर्यंतच्या मार्गातील सर्व दहीहंड्या मोठ्या कौशल्याने फोडून उपस्थितांची मने जिंकली. पावसाच्या सतत कोसळणाऱ्या धारांमध्ये भिजत, कोणतीही दुर्घटना न घडू देता पथकांनी दाखवलेला हा संयम आणि जिद्द रोह्याची परंपरा अधिक उजळवणारी ठरली.

​दहीहंड्यांचा थरार पूर्ण झाल्यानंतर सर्व गोविंदा पथके तीनबत्ती नाक्यावरून घोषणाबाजी करत कुंडलिका नदीच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि तेथे पारंपरिक विधीनुसार गोविंदा पथकांचे शांततेत विसर्जन करण्यात आले. संपूर्ण उत्सव काळात कुठेही गालबोट लागू नये यासाठी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीचे योग्य नियोजन आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण उत्सव अत्यंत सुरक्षित, शांततापूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला, ज्यामुळे रोहेकरांनी समाधान व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog