ब्रेकिंग न्यूज
🚨 सार्वजनिक गणेशोत्सवासाठी परवानगी प्रक्रिया आता गतिमान! सिटीझन पोर्टल'द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत : रायगड पोलिसांचे आवाहन 🚨

पहिल्या रायगड जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत ‘युनायटेड वुशू क्लब’चे निर्विवाद वर्चस्व

 २७ पदकांसह पटकावले विजेतेपद 

​नवीन पनवेल, दि. ३० (प्रतिनिधी) :- रायगड जिल्हा वुशू असोसिएशनच्या वतीने नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या सब-ज्युनिअर, ज्युनिअर व सीनियर रायगड जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये ‘युनायटेड वुशू क्लब’च्या खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी नोंदवत स्पर्धेचे सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर तब्बल १८ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्य अशा एकूण २७ पदकांची लयलूट करत क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. यासोबतच ईशान कुंभार आणि तनिष्का मिश्रा या दोन सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनी आपल्या आक्रमक व तंत्रशुद्ध खेळाच्या बळावर स्पर्धेतील मानाचा ‘बेस्ट फायटर’ पुरस्कारही स्वतःच्या नावे केला.

​अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत ईशान कुंभार, साहिल कुलट, पार्थ निकम, रितेश गोवारी, प्रज्वल दरेकर, वरद कलांगे, श्री विरकर, ओम कोठावळे, ध्रुवांश हिरवे, प्रतिक सानप, आयुष नवले, इक्रा तांबोळी, स्वरा कालेळ, दुर्वा पवार, तनिष्का मिश्रा, अवंती श्रेष्ठी, रुद्राणी अडव आणि अदिती मिश्रा यांनी आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर वनराज बेलवलकर, शौर्य पवार, मो. हसन फारुकी, निखिल पाल आणि आदर्श जयभाये यांनी निकराची झुंज देत रौप्यपदक पटकावले. याशिवाय स्वराज पाटील, श्रुती शिंदे, अर्णव कोळेकर आणि आरव मिश्रा यांनी कांस्यपदक मिळवून क्लबच्या पदकसंख्येत मोलाची भर घातली.

​खेळाडूंच्या या यशामागे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर, युनायटेड वुशू क्लबचे अध्यक्ष निलेश भोसले यांच्यासह प्रशिक्षक सिद्धेश कदम, अनुज भोसले, रोहित थळी आणि सुरेश राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचे कठोर परिश्रम, नियमित सराव आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावरच ही दमदार कामगिरी शक्य झाली. या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजक स्वप्नील वारंगे आणि स्मितील पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्पर्धा अत्यंत उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. युनायटेड वुशू क्लबच्या या शानदार यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे व पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, येत्या ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान आळंदी (पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या खेळाडूंना क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog