ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

साई ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा मनमानी कारभार!

चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

साई-​माणगाव (मंदेश मोरे) :- माणगाव तालुक्यातील मौजे साई ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून, या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच २५ ऑगस्ट रोजी साई ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तहकूब ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थ मंदेश मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत आणि खर्चाबाबत थेट प्रश्न उपस्थित केले असता, ग्रामसेवकाने त्यांना समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे दिली व कोणताही ठोस प्रतिसाद दिला नाही. ग्रामसभेसारख्या सर्वोच्च लोकशाही व्यासपीठावर नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून ग्रामसेवक प्रशासकीय जबाबदारी झटकत असल्याचे या प्रकारामुळे उघड झाले आहे.

​शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या स्पष्ट नियमांनुसार, ग्रामसेवकाने आपल्या नेमणुकीच्या गावात म्हणजेच मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. मात्र, साई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक या नियमांना हरताळ फासत मनमानी पद्धतीने कामकाज चालवत असून मुख्यालयात राहत नसल्याने नागरिकांना दैनंदिन कामांसाठी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम ६० क २ नुसार ग्रामपंचायतीच्या विविध योजना, विकासकामांवर झालेला प्रत्यक्ष खर्च आणि जमा-खर्चाचा तपशील तयार करून तो ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावणे तसेच ग्रामसभेपुढे पारदर्शकपणे मांडणे हे ग्रामसेवकाचे कायदेशीर कर्तव्य आहे. असे असतानाही साई ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी वारंवार खर्चाचा अहवाल मागूनही तो सादर करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

​या सर्व गंभीर गैरप्रकारांची दखल घेऊन, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकावर 'महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४' मधील नियम ४ अन्वये तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मनमानी आणि अपारदर्शक कारभाराविरोधात माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO), रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असून थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही निवेदन पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. साई ग्रामपंचायतीच्या संपूर्ण आर्थिक कारभाराची व विकासकामांची शासनामार्फत सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा साई गावातील संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog