पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या 'सीएसआर' उपक्रमातून माणगाव तालुक्यातील २३ शाळांचा कायापालट!
नूतनीकरणामुळे विद्यार्थ्यांना मिळाले सुरक्षित व आनंददायी वातावरण
माणगाव-रायगड, दि. १३ (उत्तम तांबे) :- शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायची असेल, तर शाळांची इमारत भक्कम आणि परिसर आनंददायी असणे अत्यंत गरजेचे आहे. याच सामाजिक जाणिवेच्या भावनेतून पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात 'सीएसआर' (CSR) निधीच्या माध्यमातून माणगाव तालुक्यात एक महत्त्वपूर्ण आणि व्यापक शाळा दुरुस्ती अभियान यशस्वीपणे राबवले आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावावा आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने कंपनीने आत्तापर्यंत माणगाव तालुक्यातील तब्बल २३ शाळांचे नूतनीकरण करून त्यांचा पूर्ण कायापालट केला आहे. कंपनीच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि शिक्षण क्षेत्रातील मोलाच्या योगदानाचे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून जोरदार कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक शाळांची दुरवस्था ही एक मोठी समस्या बनली होती. विशेषतः पावसाळ्यात छतातून होणारी पाणीगळती, भिंतींचे उखडलेले प्लास्टर आणि नादुरुस्त स्वच्छतागृहे यांमुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेणेही अत्यंत कठीण होऊन बसले होते. शाळांच्या या दुरवस्थेचा थेट प्रतिकूल परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत असल्याचे चित्र होते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने अत्यंत तत्परतेने पुढाकार घेतला आणि तालुक्यातील या बाधित शाळांच्या संपूर्ण दुरुस्तीचे व अद्ययावतीकरणाचे काम वेगाने हाती घेतले. अल्पावधीतच अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करून कंपनीने या सर्व शाळांचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस व वादळामुळे खचलेल्या तसेच दीर्घकाळापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध शाळांच्या नूतनीकृत इमारतींचे अतिशय उत्साहात लोकार्पण करण्यात आले. यामध्ये ३० जुलै रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा चांदे आदिवासीवाडी येथील नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, जिथे इमारत दुरुस्ती, संपूर्ण रंगरंगोटी आणि मुला-मुलींच्या स्वच्छतागृहांचे आधुनिक पद्धतीने अद्ययावतीकरण करून विद्यार्थ्यांना स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्यात आले.
त्यानंतर ३१ जुलै रोजी रा. जि. प. शाळा कडापे येथील छप्पराची संपूर्ण दुरुस्ती करून आकर्षक रंगसंगतीने शाळेला एक नवे व सुंदर रूप देण्यात आले. याच दिवशी सुशीलाताई पवार विद्यालय, भाले या शाळेचेही लोकार्पण पार पडले. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळामुळे या शाळेचे छप्पर पूर्णपणे उडून गेले होते, ज्यामुळे वर्गखोल्यांतील शैक्षणिक साहित्याची प्रचंड दाणादाण उडाली होती. या संकटसमयी पोस्को कंपनीने त्वरित पुढाकार घेत संपूर्ण छप्पराची दुरुस्ती, नवीन वीज जोडणी (इलेक्ट्रिफिकेशन) आणि आकर्षक रंगकाम करून शाळा पुन्हा पूर्ववत उभी केली.
तसेच ११ ऑगस्ट रोजी रा. जि. प. शाळा खरबाची आदिवासीवाडी येथील इमारत दुरुस्ती, बाह्य रंगरंगोटी आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून इमारतीचे हस्तांतरण करण्यात आले. या शाळांव्यतिरिक्त इतरही ३ शाळांची कामे यशस्वीपणे पूर्ण झाली असून त्यामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना आता सुरक्षित, सुंदर आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध झाले आहे.
एन संकटाच्या आणि अडचणीच्या काळात पोस्को कंपनीने मदतीचा हात पुढे केल्यामुळेच आमच्या मुलांचे शिक्षण थांबले नाही आणि त्यांना हक्काची सुरक्षित शाळा मिळाली, अशा अत्यंत भावूक भावना या लोकार्पण प्रसंगी उपस्थित पालक व शिक्षकांनी व्यक्त केल्या. या सामाजिक उपक्रमाविषयी बोलताना पोस्को कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणात कुठल्याही परिस्थितीत खंड पडू नये आणि त्यांच्या मनात शिकण्याची अधिक गोडी निर्माण व्हावी, हाच या उपक्रमामागील आमचा मुख्य उद्देश आहे. मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पोस्को परिवार कायम या भागातील नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या सर्व लोकार्पण सोहळ्यांना पोस्को कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments
Post a Comment