ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

माणगाव तालुका प्रेस क्लबचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा

 विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव 

माणगाव-रायगड, दि. १९ (उत्तम तांबे) :- रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य सेवाभावी संस्था असलेल्या 'रायगड प्रेस क्लब'शी संलग्न माणगाव तालुका प्रेस क्लबचा प्रथम वर्धापन दिन सोहळा कुणबी भवन, माणगाव येथे अत्यंत उत्साही आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा विशेष सन्मान करण्यात आला.

​कार्यक्रमाची सुरुवात बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर माणगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीने अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आदरपूर्वक स्वागत करण्यात आले.

​आपल्या अध्यक्षीय भाषणात मंत्री आदिती तटकरे यांनी माणगाव तालुका प्रेस क्लबच्या सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्याचे विशेष कौतुक केले. समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या विविध घटकांना एकत्र आणून त्यांचा गौरव करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत त्यांनी सर्व सत्कारमूर्तींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

​या सोहळ्यात विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जीवनगौरव पुरस्कार प्राप्त किशोर पितळे, ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल, वृत्तपत्र विक्रेते नितीन मेथा, वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेस्कर, समाजसेवक विजयभाई मेथा, प्रसिद्ध उद्योजक संतोष साळुंखे, मंडळ अधिकारी जोशना शिंदे, ग्रामविकास अधिकारी राजदीप जाधव, उपअभियंता रोहन ढेबरे, पाटणूस रेस्क्यू टीमचे शेलार मामा यांच्यासह माणगाव ग्रामपंचायतीचे स्वच्छता दूत कर्मचारी आणि सणसवाडी येथील नारीशक्ती ग्रामसंघाचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

​या गौरवशाली सोहळ्यास मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, पंचायत समिती सभापती विलास शिंदे, उपसभापती मनीषा मालोरे, उपनगराध्यक्ष रिया उभारे, पंचायत समिती सदस्या संगीता बक्कम, स्वाती करकरे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे, गोरेगाव विभागीय अध्यक्ष विकास गायकवाड, पोस्को कंपनीचे प्रमुख कुलदीप पुरंदरे, ज्येष्ठ समाजसेवक संजय अण्णा ढवळे, शादाब गैबी, राजाभाऊ ठाकूर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पत्रकार संदीप जाबडे यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माणगाव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, मुख्य संघटक पद्माकर उभारे, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, आरती म्हामुणकर, सचिव हरेश मोरे, खजिनदार एस. वनारसे तसेच सल्लागार उत्तम तांबे, विनोदभाई सापळे आणि सुनील राजभर यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांच्या मोठ्या प्रतिसादात हा वर्धापन दिन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog