कोलाडच्या दक्ष पत्रकारांची सामाजिक बांधीलकी ठरली दिशादर्शक!
खड्ड्यांच्या समस्येवर प्रमोदशेठ म्हसकर प्रतिष्ठान धावले मदतीला
आंबेवाडी नाक्यावरील खड्डे बुजवून मार्ग मोकळा
पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश!
रायगड, दि. ६ (भिवा पवार) :- मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाखालील आणि सर्व्हिस रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविषयी स्थानिक पत्रकारांनी पोलीस प्रशासनाकडे दाद मागून आवाज उठवला होता. रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे यांच्यासह पत्रकार भिवा पवार, विश्वास निकम, अजय परदेसी, तेजपाल जैन आणि नंदकुमार कळमकर या कोलाड परिसरातील दक्ष आणि सामाजिक भान जपणाऱ्या पत्रकारांनी या समस्येचा अत्यंत गांभीर्याने व आक्रमकपणे पाठपुरावा केला होता. या पत्रकारांनी थेट पोलीस ठाण्यात भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांना जाब विचारल्यामुळे आणि प्रसारमाध्यमांतून या धोक्याची जाणीव करून दिल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसह समाजमनही जागे झाले.
या दक्ष पत्रकारांच्या बातमीची आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची तातडीने दखल घेत, कोणतेही पद किंवा सत्ता नसताना सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व पर्यावरण क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे लोकनेते प्रमोदशेठ अनंत म्हसकर यांनी पुढाकार घेतला. प्रमोदशेठ म्हसकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोलाड आंबेवाडी नाक्यावरील रखडलेल्या व धोकादायक बनलेल्या मार्गावरील खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्यात आला असून, यामुळे प्रवाशांचा प्रवास आता सुरक्षित झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे उड्डाणपुलाखाली आणि दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे रोज लहान-मोठे अपघात होत होते. या रस्त्यावरून जाताना दुचाकी आणि चारचाकी वाहने अडकून पडत होती, तर नुकतीच एक प्रवासी बस या खड्ड्यांमध्ये कलंडता कलंडता बचावली होती. नागरिकांना आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतानाही, संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत होते. या गंभीर परिस्थितीची भीषणता ओळखून डॉ. श्याम लोखंडे, भिवा पवार, विश्वास निकम, अजय परदेसी, तेजपाल जैन व नंदकुमार कळमकर या पत्रकारांनी दाखवलेली तत्परता खरोखरच कौतुकास्पद ठरली.
डिजीटल मीडिया व वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि खड्ड्यांचे भयानक दृश्य समोर आल्यानंतर, प्रमोदशेठ म्हसकर यांनी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता आपल्या प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दगड, खडी व माती टाकून खड्डे बुजवत मार्ग चकाचक केला. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली सोळा-सतरा वर्षे रखडलेले असताना आणि ठेकेदारांच्या मनमानी कामांवर प्रशासनाचे नियंत्रण नसताना, सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी धावून आलेले प्रमोदशेठ म्हसकर यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचप्रमाणे, जनतेच्या समस्येला योग्य वेळी वाचा फोडणारे रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे यांच्यासह भिवा पवार, विश्वास निकम, अजय परदेसी, तेजपाल जैन आणि नंदकुमार कळमकर या कोलाडमधील सर्व दक्ष पत्रकारांवर नागरिकांकडून शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.




Comments
Post a Comment