ब्रेकिंग न्यूज
🚨 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 🚨

प्रकाश कोळी यांची रोहा शिवसेना शहरप्रमुखपदी निवड

 शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण 

​रोहा-रायगड (प्रतिनिधी) :- रोहा शहरातील तरुण, अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून सर्वपरिचित असलेले प्रकाश कोळी यांची शिवसेना (शिंदे गट) रोहा शहरप्रमुखपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रोहा शहरप्रमुखपद रिक्त असल्यामुळे पक्षाच्या स्थानिक हालचालींना मर्यादा येत होत्या; मात्र आता प्रकाश कोळी यांच्या रूपाने अभ्यासू आणि तडफदार नेतृत्व मिळाल्याने पक्षाच्या स्थानिक संघटनेला मोठी नवसंजीवनी मिळण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीमुळे रोहा शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह विशेषतः युवा शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​या महत्त्वाच्या नियुक्तीसाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर तसेच रायगड लोकसभा मतदारसंघप्रमुख अनिल नवगणे यांच्या आदेशानुसार प्रकाश कोळी यांच्यावर रोहा शहरप्रमुखपदाची ही गुरुकिल्ली सोपविण्यात आली आहे. प्रकाश कोळी यांना सार्वजनिक आणि राजकीय जीवनाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी यापूर्वी रोहा नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे काम अत्यंत प्रभावीपणे सांभाळले आहे. याशिवाय त्यांनी पक्षातील विविध जबाबदाऱ्याही तितक्याच यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्यातील उत्तम संघटन कौशल्य, कामातील जिद्द, चिकाटी आणि सामान्य कार्यकर्त्यांशी असलेला थेट आणि सातत्यपूर्ण संपर्क या गुणांमुळेच त्यांना पक्षात एक उमदे आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून स्थान मिळाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली रोहा शहरातील शिवसेना संघटना अधिक मजबूत आणि आक्रमक होईल, असा ठाम विश्वास पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

​आपल्या या नियुक्तीनंतर मनोमन कृतज्ञता व्यक्त करताना नवनिर्वाचित शहरप्रमुख प्रकाश कोळी यांनी सांगितले की, "शिवसेना पक्ष नेतृत्वाने माझ्यावर जो मोठा विश्वास दाखवून ही शहरप्रमुखपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे, ती मी पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि इमानदारीने पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहीन. पक्षाची संघटनात्मक ताकद तळागाळापर्यंत वाढविण्यासाठी शहरातील जुन्या-नव्या सर्व शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एकत्र घेऊनच मी पुढील कामकाज करणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाची लोककल्याणकारी विचारधारा आणि शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे रोहा शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्नशील राहीन."

दरम्यान, प्रकाश कोळी यांची रोहा शहरप्रमुखपदी निवड झाल्याचे वृत्त समजताच शिवसेनेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील यशस्वी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा जोरदार वर्षाव केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog